राज कपूर भारतीय चित्रपटसृष्टीतील 'शोमॅन' म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले, जे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मात्र त्यांच्या यशस्वी प्रवासात काही ठिकाणी अपयशही आले. त्यापैकी एक प्रमुख चित्रपट म्हणजे 'मेरा नाम जोकर'.
मेरा नाम जोकर: घर गहाण ठेवून बनवलेला चित्रपट
18 डिसेंबर 1970 रोजी प्रदर्शित झालेला 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट राज कपूर यांच्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय त्यांनी स्वतः केले. चित्रपटात त्यांनी एका जोकरची हृदयस्पर्शी कथा मांडली होती, जी हसवतानाचं डोळ्यांत पाणी आणणारी होती. मात्र, या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मोठा त्याग केला. चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले घर गहाण ठेवले आणि तब्बल 6 वर्षे मेहनत घेतली. चित्रपटात दोन इंटरव्हल्स होते आणि त्याची लांबी जवळपास 4 तासांपर्यंत होती, जे त्या काळात एक अनोखा प्रयोग मानला गेला.
मात्र प्रचंड अपेक्षा आणि मेहनतीनंतरही 'मेरा नाम जोकर' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटाने त्यांना आर्थिक संकटात टाकले. त्यावेळी राज कपूर यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. असे असले तरी, आजच्या काळात 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट कल्ट क्लासिक मानला जातो आणि त्यातील कथा, संगीत आणि अभिनय याला रसिकांकडून खूप प्रेम मिळते.
'बॉबी'ने वाचवले नुकसान
'मेरा नाम जोकर' नंतर राज कपूर यांनी एका मोठ्या स्टारसोबत रोमँटिक चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. मात्र, आर्थिक तणावांमुळे ते शक्य झाले नाही. यानंतर त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि 1973 साली त्यांनी आपला मुलगा ऋषी कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना घेऊन 'बॉबी' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याच्या यशाने राज कपूर यांना सर्व कर्ज फेडण्याची संधी मिळाली.
आगीत नष्ट झालेला वारसा
2017 मध्ये सुपर डान्सर 2 च्या सेटवर लागलेल्या आगीत, राज कपूर यांच्या RK स्टुडिओला मोठे नुकसान झाले. त्या आगीत 'मेरा नाम जोकर' चित्रपटात वापरलेला प्रसिद्ध जोकरचा मुखवटा आणि राज कपूर यांनी परिधान केलेला पोशाख जळून खाक झाला.
यंदा 14 डिसेंबर 2024 रोजी राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य पुन्हा एकदा आठवले जात आहे. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अनमोल आहे. 'मेरा नाम जोकर' चा प्रवास हे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या अथक परिश्रमांचे आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे.