लॉस एंजिलिस : लैंगिक अत्याचाराचा मुद्दा केवळ बॉलिवूडच नव्हे तर, हॉलिवूडमध्येही गाजतो आहे. म्हणूनच हॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींनी या विरोधात एक नवे अभियानच सुरू केले आहे. 'टाईम्स अप' (Time's Up) असे या अभियनाचे नाव आहे.
खास करून हे अभियान हॉलिवूडमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत (Sexual Harassment) आवाज उठविण्यासाठी आहे. महत्त्वाचे असे की, हे अभियान हार्वे वाईनस्टाईन यांच्या कथीत लैंगिक शोषण प्रकरणानंतर सुरू करण्यात आले आहे. हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा हे अभियान 'टाईम्स अप' नावाने सुरू केले जात आहे. या अभियानात मेरिल स्ट्रीप, रीस विदरस्पून, निकोल किडमॅन, मार्गोट रॉबी, जेनिफर एनिस्टन, एशले ज्यूड, अमेरिका फेरेरा, नॅटली पोर्टमॅन, एम्मा स्टोन आणि कॅरी वॉशिंग्टन यांसारखे दिग्गज मंडळी सहभागी होत आहेत.
'द न्यूयॉर्क टाईम्स'ने औपचारीकपणे या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानासाठी चित्रपट उद्योगाशी संबंधीत असंख्य महिलांनी एका खूल्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या अभियानांतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निधी उभारला जाईल. ज्यात सुमारे 1.3 कोटी डॉलर इतका निधी असेल. या नीधीचा वापर केवळ लैंगिक अत्याचाराशी संबंधीत खटले लढविण्यासाठी केला जाईल.
या अभियानासाठी निधी जमा करण्यास सुरूवातही झाली असून, केटी मॅकग्रा, जेजे अब्राम, जेनिफर एनिस्टन, मेरिल स्ट्रीप, केट कॅपशॉ यांसारख्या दिग्गज व्यक्ती आणि स्टीफन स्पीलबर्ग यांची संस्था वुंडरकाइंडर फाऊंडेशनसारख्या संस्थांनीही नीधी जमा केला आहे.