'तुला कळणार नाही' सिनेमाचे टायटल सॉंग लॉंच

 नवरा - बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तीखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही! 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 01:10 PM IST
 'तुला कळणार नाही' सिनेमाचे टायटल सॉंग लॉंच  title=

मुंबई :  नवरा - बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तीखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही! 

अश्या या गोंडस नात्याची गुजगोष्ट मांडणारा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टरचे आणि शीर्षक गीताचे संताक्रुझ येथील लाईटबॉक्समध्ये अनावरण करण्यात आले. वैवाहिक दाम्पत्यांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे, चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत स्वप्नील आणि लीना या जोशी दाम्पत्यांनी सिनेमाचे शीर्षक गीत लॉंच केले. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा पोस्टरदेखील यावेळी सादर करण्यात आला. 

 'मोडीत निघालेल्या ओढीची... गोष्ट वेड्या जोडीची...' असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येत असून, प्रत्येक घराघरातील नवरा बायकोची केमिस्ट्री आपल्याला यात पहायला मिळते.  या सिनेमाच्या शीर्षकगीतामध्येदेखील हीच केमिस्ट्री दिसून येते. रोमेंटिक बाज असलेल्या या शीर्षकगीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीतदिग्दर्शन अमितराज यांनी त्याला चाल दिली आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या गोड गळ्याच्या 
गायकांचा आवाज लाभला आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील अबोल प्रेम दाखवणारे हे गाणे, विवाहित दाम्पत्यांसाठी खास असणार आहे. 

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची सुरुवातच सुबोध आणि सोनालीच्या जुगलबंदीने झाली. नवरा बायकोत उडणारे हलके फुलके खटके अगदी गमतीदार पद्धतीने मांडत त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सिनेमाद्वारे स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून, अनेक सुपरहिट सिनेमांचे वितरक आणि निर्माते असलेल्या जीसिम्ससोबत तो या पुढील प्रवासातदेखील निर्माता म्हणून कायम राहणार आहे. श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांची निर्मिती आणि निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास येत आहे.