तुझ्यात जीव रंगला : राणाच जेवण बघून सखी झाली थक्क

मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ९ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात मजेदार झाली. सकाळी डाएट नाष्टा राणापुढे ताक, कढधान्य, फळं आणि अंडी मोठ्या प्रमाणात ठेवली जातात ते पाहून राणा चांगलाच ताव मारतो आणि बघता बघता समोर ठेवलेल्या सर्व गोष्टी फस्त करून टाकतो. हे बघून थक्क झालेली सखी, म्हणते एकावेळी एक माणूस एवढ्या गोष्टी कसाकाय खाऊ शकतो? ते ऐकून अंजली म्हणते, त्यांना एवढं खायची सवय आहे. तरीही सखीला हे सारं थक्क करण्यासारखंच वाटतं. व एकावेळी एवढं खाणं चांगलं नसतं असं सांगून, आज पासून दर दोन तासाला मी सांगेन तेच खायचं असं सखी राणाला सांगते. हे एकून आबाही रोज डाएट करणार असे सर्वांपुढे सांगतात.

दुसरीकडे भाल्या आणि वस्ताद राणा बद्दल बोलत जात असतात तेव्हा त्यांना मध्येच सखीचा असिस्टंट मॅनेजर दिसतो. ते दोघंही त्याला सखीने कामावरून काढली का असं विचारात. पण मॅनेजर वस्ताद आणि भाल्याच्या मनात सखी बद्दल नको ते भरतो, म्हणजे सखी राणाची कुस्ती बंद करून त्याला नको ते करायला लावते आहे, व जर का राणाची कुस्ती बंद झाली तर तुमचे काय होणार असे सांगून तो निघून जातो. दरम्यान भाल्याची बायको सखीकडे डब्बा घेऊन येते आणि आमच्याही धन्याच्या कुस्तीकडे लक्ष द्या की अशी विनंती करते. परंतु सखी म्हणते ते सर्वांना जमत नाही ग. तेवढ्यात भाल्या आणि वस्ताद राणाची कुस्ती बंद केल्याचा सखीला जाब विचारायला येतात. तेथे आपल्या बायकोला बघून भाल्या चकीत होतो आणि आपल्या बायकोला इथं का आलीस असे विचारतो. आपल्या नवऱ्याला बघून गडबडलेली भाल्याची बायको उडवाउडवीचे कारण सांगून निघून जाते. दरम्यान वस्ताद सखीला राणाची कुस्ती का बंद केली असा प्रश्न विचारल्यावर सखी वस्तादांना राणाने यापुढे कसे लढले पाहिजे हे समजावून सांगते. व यापुढे राणाला ट्रेन करण्यासाठी तुम्हीही माझी मदत कराल का अशी विनवणी करते. सखीचे बोलणे मनावर घेऊन वस्ताद सखीला मदत करण्यास तैयार होतात.

दुसरीकडे नुकतेच पोटभर जेवलेला राणा तालमीत जायला निघतो. तेव्हा अंजली त्याला सखीला विचारल्याशिवाय कुस्ती खेळायला जाऊ नका असे सांगते. परंतु कुस्ती खेळायचे नाही असे ऐकेल तो राणा कुठचा. अंजली काही एक ना ऐकता राणा तालमीसाठी निघून जातो. दरम्यान तालमीत पोहचल्यावर राणा वस्तादांना म्हणतो, मला वाचावा की, त्या मॅनेजर बाईंनी माझी कुस्ती बंद केलीय हो. ते ऐकून वस्ताद म्हणतात, तिने बरोबरच केले आहे. यापुढे तुला तालमीतल्या मातीत उतरायचे असेल तर मॅनेजर बाईंची परवानगी घेऊन ये मगच कुस्तीला उभा राहा असेही वस्ताद राणाला सांगतात. आपल्या वस्तादही आता आपल्या समोर सखीचे गुणगान गात आहेत हे बघून राणा निराश होऊन जातो. आपल्या वस्तादांनीही पाठ फिरवल्यावर राणा सखीच्यापासून सुटका करण्यासाठी आणि कुस्ती खेळण्यासाठी कुणाची मदत घेत हे बघण्यासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.