तुझ्यात जीव रंगला : राणाच्या आयुष्याला मिळणार अनपेक्षित कलाटणी

काय करणार राणा दा आणि पाठक बाई? 

तुझ्यात जीव रंगला : राणाच्या आयुष्याला मिळणार अनपेक्षित कलाटणी

मुंबई : झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला तसेच टीआरपीचे नवे उच्चांक गाठले. शिक्षणाचं महत्व जाणणारी पाठक बाई आणि रांगड्या मातीत कुस्ती खेळून व काळ्या मातीत सोनं पिकवून मातीशी नाळ जोडलेला असलेला राणादा यांच्या व्यक्तिरेखेबाबती फिरणारे कथानक असलेल्या या मालिकेतील पाठक बाई आणि राणादा सोबतच प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे.

राणा दा मॅटवरची कुस्ती खेळणार का? 

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की नंदिताच्या कारस्थानामुळे राणाला लीग कुस्ती मॅचचं कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं. मनात नसताना देखील फक्त घरच्यांचा शब्द पाळण्यासाठी राणा मॅटवरची कुस्ती खेळायला तयार होतो. आगामी भागात प्रेक्षक पाहू शकतील की राणाला मॅटवरच्या कुस्तीसाठी ट्रेन करण्यासाठी कोचला पाठवण्यात येतं. पण कोचसोबत राणाचं गणित जुळत नाही. म्हणून अखेर राणासाठी एक मॅनेजर पाठवायचं ठरतं. रविवार २२ जुलैला ८ वाजता प्रसारित होणाऱ्या महाएपिसोड मध्ये राणा मॅनेजरसाठी स्वागतासाठी तयार झाल्याचे प्रेक्षक पाहू शकतील. मॅनेजरची एण्ट्री होते आणि राणा पळ काढतो. मॅनेजर म्हणून बाईमाणूस आल्याने राणाची पळापळ प्रेक्षक महाएपिसोडमध्ये अनुभवू शकतील. या सर्व प्रसंगामुळे राणाच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे इतकं मात्र नक्की.

आयुष्याच्या आखाड्यात अनपेक्षित व्यक्तीसमोर कसा निभाव लागेल राणाचा? मनाविरुद्ध खेळत असलेल्या मॅटवरील कुस्तीत राणा यशस्वी ठरेल का? नंदिता तिच्या कट-कारस्थानांमध्ये यशस्वी होईल का? याची उत्तरं प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळतील.