Crime News: टीव्ही अभिनेत्री चंद्रिका साहाने (Chandrika Saha) आपल्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 'अदालत', 'सीआयडी' आणि 'सावधान इंडिया'सारख्या कार्यक्रमांममधील आपल्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रिका साहाच्या 21 वर्षीय पती अमन मिश्राने मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये अमन मिश्रा 15 महिन्याच्या चिमुरड्याला जमिनीवर आपटताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील अमन मिश्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो जमिनीवर बसलेला असून, मुलगा त्याच्यासमोर पडलेला दिसत आहे. दरम्यान, चंद्रिकाने यानंतर मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय अभिनेत्रीने मुलगा जखमी अवस्थेत आढळल्यानंतर बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी ती सोबत सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही घेऊन आली होती.
शुक्रवारी चंद्रिका साहाने तक्रार दाखल केली असून त्यात माहिती दिली आहे की, आपला मुलगा रडू लागला तेव्हा मी किचनमध्ये होते. मी अमनला मुलाची काळजी घ्यायला सांगितलं. यानंतर तो त्याला घेऊन बेडरुममध्ये गेला. पण काही वेळाने मुलगा अजून जोरात रडू लागल्याचा आवाज आला. तसंच काहीतरी जोरात जमिनीवर आपटलं असल्याचाही आवाज आला. चंद्रिका रुममध्ये पळत गेली तेव्हा मुलगा जखमी अवस्थेत खाली जमिनीवर पडलेला होता.
यानंतर चंद्रिका मुलाला घेऊन मालाड पश्चिमेकडील खासगी रुग्णालयात गेली. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर चंद्रिकाने बेडरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं. यावेळी तिला अमन मुलाला तीन वेळा जमिनीवर आपटत असल्याचं दिसल्यानंतर धक्काच बसला. यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांना सीसीटीव्ही दाखवत पती अमनविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चंद्रिका साहा मालाडची रहिवासी आहे. आपला पती मुलामुळे आनंदी नव्हता असं तिने सांगितलं आहे. चंद्रिकाचा घटस्फोट झालेला असून 2020 मध्ये तिची अमनशी भेट जाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यावेळी अमनला चंद्रिका गर्भवती असल्याचं समजलं होतं. यानंतर त्याने चंद्रिकाला गर्भपात करण्याचा आग्रह केला होता. पण डॉक्टरांनी मूल पाडू नका असा सल्ला दिल्याने त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र मुलावरुन त्यांच्यात वारंवार भांडण होत होतं. याचदरम्यान मुलगा 14 महिन्यांचा असता दोघांनी लग्नगाठ बांधली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही याप्रकरणी तपास करत असून, सीसीटीव्हीदेखील तपासत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.