वाढत्या उष्णतेमुळे दीपिकाच्या डोळ्यात झाल्या रक्ताच्या गाठी, म्हणाली 'हे बरं होण्यासाठी...'

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अनेक कलाकारही वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. आता वाढत्या तापमानामुळे अभिनेत्री दीपिकाच्या डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. 

Updated: Jun 1, 2024, 05:37 PM IST
वाढत्या उष्णतेमुळे दीपिकाच्या डोळ्यात झाल्या रक्ताच्या गाठी, म्हणाली 'हे बरं होण्यासाठी...' title=

Deepika Singh Blood Clot In Eye : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. भारतात बिहार, झारखंड, ओडिशा, दिल्लीसह महाराष्ट्रात सध्या उष्णतेच्या लाटेने हाहाकार पाहायला मिळत आहे. विदर्भ, खानदेश, सोलापूर, नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच पणजीमध्येही गेल्या दोन दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अनेक कलाकारही वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. आता वाढत्या तापमानामुळे अभिनेत्री दीपिका सिंगला डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. 

‘दिया और बाती हम’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून दीपिका सिंगला ओळखले जाते. दीपिका सिंगला उष्माघातामुळे डोळ्यात रक्ताची गाठ झाली आहे. ती मंगल लक्ष्मी या कार्यक्रमाचे शूटींग करत असताना अचानक दीपिका सिंगच्या उजव्या डोळ्यात खाज आणि जळजळ होऊ लागली. त्यानंतर तिच्या सहकलाकाराने पाहिले, तेव्हा तिच्या उजव्या डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे समजले. यामुळे तिला शूटींगदरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागला.  

बरं होण्यासाठी 5 दिवस लागतील

दीपिकाने याबद्दल एक हिंदुस्तान टाइम्सशी बातचीत केली. यावेळी ती म्हणाली, "मला जेव्हा माझ्या सहकलाकाराने डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या, असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासात मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी मला लगेचच औषधे घेण्यास तसेच डोळ्यांचा एक ड्रॉप दिला. मला यातून बरं होण्यासाठी साधारण 5 दिवस लागतील." 

शूटींगवर परिणाम

"मला डॉक्टरांनी डोळ्यावर जास्त ताण देण्यास मनाई केली आहे. तसेच शूटींगदरम्यान ग्लिसरीन वापरण्यासही बंद घालण्यात आली आहे. या मालिकेत माझ्या रडण्याची अनेक दृश्य आहेत. एक अभिनेत्री म्हणून सर्वाधिक भावना या डोळ्यातून व्यक्त होतात. माझ्या उजव्या डोळ्यात रक्ताची गाठ झाली आहे. त्यामुळे आम्ही बहुतांश शूट हे डाव्या बाजूने करत आहोत. या कारणांमुळे कार्यक्रमाच्या शूटींगवर परिणाम होत आहे." 

"उष्माघातामुळे माझ्या डोळ्यात रक्ताची गाठ होण्याची ही घटना पहिल्यांदाच घडत आहे. मी इतक्या वर्षांपासून शूटींग करत आहे. पण मला अशाचप्रकारचा त्रास कधीच झाला नाही. माझे शूटींग हे मड आयलँडवर सुरु आहे. या ठिकाणी तापमान खूप जास्त आहे. त्यामुळेच शरीरातील तापमानात वाढ झाली. सध्या आमच्या मालिकेत लग्नाच्या सीनचे शूटींग सुरु आहे. मी यातील प्रत्येक सीनमध्ये आहे. त्यामुळेच मी आराम देखील करु शकत नाही. यादरम्यान मी लिक्विड डायटवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या डायटमध्ये नारळ पाणी, छास यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. तसेच जेव्हा माझे शूटींग नसते, तेव्हा मी डोळे बंद करुन बसलेली असते", असे दीपिका सिंगने सांगितले. 

दरम्यान दीपिका सिंह ही अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. ती 'मंगल लक्ष्मी' या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेत दोन बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. यात दीपिका ही मंगल हे पात्र साकारत आहे.