मुंबई : टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्यातील कर्ली क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले आहेत. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. फोगट यांचे पीए सुधीर सांगवान, कर्ली क्लबचे मालक सुखविंदर सिंग आणि ड्रग्ज विक्रेता पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता या प्रकरणात कोणतं नवीन वळण लागेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्ली क्लबच्या मालकाला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या आरोपानंतर सुधीर आणि सुखबिंदरला अटक केली. सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी 22 ऑगस्टला फोगट यांच्यासोबत गोव्यात पोहोचले होते. प्रत्यक्षात सोनालीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते.
दरम्यान, सोनाली फोगट यांच्या मृत्यूविषयी नवनवीन खुलासे समोर येत आहेत नुकतंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.ज्यामध्ये सोनाली फोगट यांची अवस्था अतिशय वाईट दिसतेय त्यांना चालणंसुद्धा कठीण होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं.
गोवा पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु ठेवला आहे. सोनाली यांचा भाऊ, रिंकू ढाकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना सिनेमाच्या चित्रीकरणाच्या बहाण्यानं गोव्यात आणलं गेलं. पण, इथं कोणतंही चित्रीकरण होणार नव्हतं.