मुंबई : भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या खऱ्या घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे चित्रपट निर्मात्यांना एकच धक्का बसलाय. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलीय. रोनी स्क्रूवाला हा या सिनेमाचा निर्माता आहे तर या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यानं केलंय. उल्लेखनीय म्हणजे, या सिनेमाच्या यशानंतर निर्माता रोनी स्क्रूवाला यानं सेना दिनाचं औचित्य साधत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देऊ केली होती.
'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमात रोनी स्क्रूवाला, आदित्य धर, विक्की कौशल, यामी गौतम परेश रावल आणि मोहित रैना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ११ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
जम्मू काश्मीरच्या उरीत २०१६ साली आर्मी कॅम्पमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देशाला हादरा बसला. या हल्याचा बदला घेण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यात आलं. याच सत्य घटनेवर हा सिनेमा बेतल्याचं सांगण्यात येतंय.
हा सिनेमा प्रदर्शित होऊन अजून पहिला आठवडाही उलटलेला नाही. केवळ चार दिवसांत या सिनेमानं ५० कोटींचा टप्पा पार केला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे, या सिनेमानं या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गेल्या शुक्रवारी ८.२५ करोड रुपये आणि दुसऱ्या दिवशी १२.२५ करोड रुपये, तिसऱ्या दिवशी १५ करोड रुपयांची कमाई केली. तर सोमवारी चौथ्या दिवशी १०.२५ करोड रुपये, मंगळवारी ९.५ करोड रुपये तर बुधवारी ५-७ करोड रुपयांची कमाई केलीय.
२५ करोड रुपयांत बनलेल्या 'उरी'नं पहिल्याच आठवड्यात दुप्पटीहून जास्त कमाई करत कमाईत ६५-६८ करोडचा आकडा गाठलाय.