'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अ‍ॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.   

Intern | Updated: Dec 10, 2024, 04:07 PM IST
'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अ‍ॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला  title=

Varun dhawan's new movie: हा चित्रपट 'पुष्पा 2' नंतरचा एक बहुचर्चित सिनेमा ठरत आहे. अ‍ॅक्शन आणि थराराने परिपूर्ण असलेल्या 'बेबी जॉन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. वरुणसोबत या चित्रपटात क्रिती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, सायना मल्होत्रा, राजपाल यादव आणि शीबा चड्ढा हे कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, निर्मात्यांनी प्रेक्षकांना खरी ख्रिसमस भेट म्हणून या चित्रपटात सलमान खानचा छोटासा पण दमदार कॅमिओ दिला आहे, जो चर्चेचा विषय ठरत आहे.  

वरुण धवनचा नवा अंदाज
वरुण धवनसाठी 'बेबी जॉन' हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कॉमेडी आणि रोमँटिक भूमिकांमुळे लोकप्रिय असलेल्या वरुणने आता अ‍ॅक्शनचा मार्ग निवडला आहे. त्याला 'चॉकलेट बॉय' म्हणणाऱ्या प्रेक्षकांना या चित्रपटातून तो वेगळ्या रूपात दिसणार आहे.  

ट्रेलरची सुरुवात वरुणच्या मुलीशी बोलण्याने होते, जिथे त्याला एक साधा, निर्दोष कणिक मळणारा माणूस दाखवला आहे. मात्र, तो गुन्हेगारांविरोधात हिंसक होतो. वरुणची भूमिका रॉबिनहूडसारखी आहे. चांगल्या लोकांसाठी देवदूत आणि वाईट लोकांसाठी राक्षस. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, ज्याचा वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसतो.  

जॅकी श्रॉफचा खलनायक लूक
चित्रपटातील मुख्य खलनायकाची भूमिका जॅकी श्रॉफने साकारली आहे. त्याचा अनोखा लूक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. याआधी 'सूर्यवंशी'मध्ये खलनायकाची भूमिका गाजवलेल्या जॅकीने या चित्रपटात आणखी दमदार सादरीकरण केले आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, जॅकी श्रॉफचा खलनायक वरुणच्या कुटुंबावर मोठं संकट आणतो, ज्यामुळे वरुण अधिक क्रूर आणि हिंसक होतो.  

सलमान खानचा दमदार कॅमिओ
ट्रेलरच्या शेवटच्या काही सेकंदांत सलमान खानचा छोटासा रोल दिसतो, जो प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे. सलमान केवळ दोन सेकंदांसाठी स्क्रीनवर दिसतो, पण त्याच्या एका संवादानेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलरच्या शेवटी तो 'मेरी ख्रिसमस' म्हणतो, ज्यामुळे चित्रपटासाठी प्रेक्षक आणखी उत्साही झाले आहेत.  

'थेरी'चा रिमेक, पण वेगळ्या ट्विस्टसह
'बेबी जॉन' हा प्रसिद्ध तामिळ चित्रपट 'थेरी' चा रिमेक आहे. 'थेरी'मध्ये थलपथी विजय, सामंथा रुथ प्रभू आणि एमी जॅक्सन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र, दिग्दर्शक ऍटलीने या चित्रपटात एक अनोखा ट्विस्ट दिला आहे, ज्यामुळे तो ओरिजनल चित्रपटापेक्षा वेगळा ठरणार आहे.  

हिंसक चित्रपटांचा नवा ट्रेंड
'जवान' आणि 'अ‍ॅनिमल' यांसारख्या चित्रपटांमुळे अ‍ॅक्शन सिनेमा हा बॉलिवूडमधला नवा ट्रेंड ठरत आहे. 'बेबी जॉन'ही त्यातलाचं एक चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये वरुण धवनच्या जबरदस्त फाईट सीनची झलक दिसते. तो एकाच वेळी शेकडो लोकांशी लढताना दाखवला आहे, जे प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार आहे.  

चित्रपटाचा प्रदर्शन दिवस
'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने तो प्रेक्षकांसाठी खास भेट ठरणार आहे. अ‍ॅक्शन, ड्रामा, आणि थराराचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांची मोठ्या अपेक्षा आहेत.