तुम्ही दिवाळखोर झालात? कर्ज फेडण्यासाठी ऑफिस विकलंत? वाशू भगनानी यांनी मौन सोडल, म्हणाले 'बडे मियाँ...'

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी (Vashu Bhagnani) आणि त्यांचा मुलगा जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) सध्या चर्चेत आहेत. याचं कारण काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी पूजा एंटरटेनमेंटने (Pooja Entertainment) पैसे थकवले असल्याचा आरोप केला होता.   

शिवराज यादव | Updated: Jun 26, 2024, 09:59 AM IST
तुम्ही दिवाळखोर झालात? कर्ज फेडण्यासाठी ऑफिस विकलंत? वाशू भगनानी यांनी मौन सोडल, म्हणाले 'बडे मियाँ...' title=

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी (Vashu Bhagnani) आणि त्यांचा मुलगा जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) कर्जबाजारी झाले असून कर्ज फे़डण्यासाठी मुंबईतील आपलं प्रोडक्शन हाऊसचं आलिशान कार्यालय विकल्याची चर्चा सध्या सुरु आहे. वाशू भगनानी यांचं पूजा एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस सध्या जॅकी भगनानी चालवत आहे. 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्याने त्यांनी अनेकांचे पैसे थकवले असून आपलं कार्यालयही विकल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान वाशू भगनानी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सर्व रिपोर्ट्स फेटाळले आहेत. तसंच इमारत पुनर्विकसित केली जात असून आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्याच टीमसह काम करत आहोत आणि अद्याप तरी कोणीही अधिकृत तक्रार केली नसल्याचं वाशू भगनानी यांनी सांगितलं आहे. 

वाशू भगनानी यांनी काय सांगितलं आहे?

कर्मचाऱ्यांचे पैसे थकवल्याच्या आरोपावर वाशू भगनानी म्हणाले की, “मी गेल्या 30 वर्षांपासून या व्यवसायात आहे. आम्ही पैसे थकवलेत असा दावा करणारे लोक असतील तर त्यांनी पुढे येऊन आमच्याशी बोलले पाहिजे. त्यांचे पूजा एंटरटेनमेंटशी योग्य करार आहेत का? त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे का? सोशल मीडियावर शेरेबाजी करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही समस्या असल्यास, आम्ही त्याचे निराकरण करू. कोणीही पळून जात नाही. कृपया माझ्या कार्यालयात या, आमच्याशी बोला, आम्हाला तुमची कागदपत्रे द्या आणि आम्हाला मार्ग शोधण्यासाठी 60 दिवस द्या. मी कोणत्याही दबावाला किंवा ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्ही यूकेमधील प्रोडक्शन हाऊससोबतही काम करतो. जर त्यांनी कोणाला पैसे दिले असतील तर लोकांनी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे”.

यावेळी त्यांनी ऑफिस विकल्याचे दावेही फेटाळून लावले. कार्यालयाच्या जागेचा पुनर्विकास सुरू आहे, ज्याचे नियोजन वर्षभरापूर्वी करण्यात आले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज झाल्यानंतर आता काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती वाशू भगनानी यांनी दिली.  त्यांनी यावेळी चित्रपट हिट आणि फ्लॉप होणं हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि ते आधीपासूनच त्याच्या पुढील प्रोजेक्टवर काम करत आहेत, जी मोठ्या प्रमाणावर ॲनिमेशन मालिका असेल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झाला होता. चित्रपटासाठी 350 कोटी खर्च कऱण्यात आले होते. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आणि फक्त 59.17 कोटी कमवू शकता. याच पार्श्वभूमीवर प्रोडक्शन हाऊसने कर्मचाऱी कपात केल्याचे दावे आहेत.