लतादीदींचा ब्रीच कँडी रुग्णालयातील फोटो व्हायरल

चाहत्यांना दीदींच्या प्रकृतीची चिंता 

Updated: Dec 10, 2019, 12:38 PM IST
लतादीदींचा ब्रीच कँडी रुग्णालयातील फोटो व्हायरल
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आपल्या दैवी स्वरांनी प्रेक्षकांच्या विशेषत: श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी चाहते कायमच प्रार्थना करत असतात. साधारण महिनाभरापूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात दीदींना दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांना घरी सोडण्यात आलं ज्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे. 

रुग्णालयात दाखल केल्याचं कळतातच जगभरातील चाहत्यांची लतादीदींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली होती. निमोनिया झाल्यामुळे श्वसानाचा त्रास उदभवल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. आता मात्र दीदींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सध्या सोशल मीडियावर ब्रीच कँडी रुग्णालयात असतेवेळीचा लता मंगेशकर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. रुग्णालयातील हा फोटो, दीदीचं वाढतं वय आणि त्यांची प्रकृती पाहता चाहत्यांना चिंता वाटत आहे हे काही नाकारता येणार नाही. 

व्हायरल होणारे हे फोटो रुग्णालयातील असल्याचं सांगण्यात येत असून, रुग्णालयातील परिचारिकाही त्यात दिसत आहेत. ९० वर्षांच्या लतादीदी यांच्या प्रकृतीत येत्या काळातही चांगल्या सुधारणा व्हाव्यात अशीच प्रार्थना प्रत्येक चाहत्याकडून केली जात आहे. भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्रात त्यांचं अभूतपूर्व योगदान पाहता दीदींच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.