चीनमध्ये प्रदर्शित होणार 'काबिल'; चाहत्यांकडून हृतिकचे जंगी स्वागत

चीनमध्येही हृतिकचा मोठा चाहतावर्ग...

Updated: Jun 1, 2019, 01:40 PM IST
चीनमध्ये प्रदर्शित होणार 'काबिल'; चाहत्यांकडून हृतिकचे जंगी स्वागत title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'काबिल' चित्रपट लवकरच चीनमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हृतिक चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बीजिंगमध्ये दाखल झाला आहे. चीनमध्ये विमानतळावरच हृतिकचं त्यांच्या चीनी चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. चीनमधील हृतिकच्या चाहत्यांनी त्याला 'दा शुआई' असं नाव दिलं आहे. 'दा शुआई' म्हणजे अतिशय सुंदर. हृतिक विमानतळावर दाखल होताच त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. 

भारतात हृतिकला 'ग्रीक गॉड' या नावानेही ओळखलं जातं. चीनमध्येही हृतिकचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे भारताच्या शेजारी देशातूनही हृतिकला चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. येत्या २ जून रोजी 'काबिल' चित्रपटचा प्रीमियर प्रदर्शित होणार आहे. तर ५ जून रोजी 'काबिल' चीनमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये 'काबिल' प्रदर्शनाच्या आधीच हिट झाला आहे. हृतिकला अनेक चीनी चाहत्यांचे चित्रपटासाठी मेसेजही येत आहेत.  

 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan The Greek God (@hrithik_roshan_the_greek_god) on

'काबिल'ने बॉलिवूड बॉक्सऑफिसवर ८६ कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपट समीक्षकांकडूनही चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. या चित्रपटातून हृतिक रोशन आणि यामी गौतम यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली आहे. आता चीनमध्ये चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हृतिक आगामी 'सुपर ३०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका गणितज्ञाची भूमिका साकारणार आहे.