मुंबई : सेलिब्रिटी मंडळी आणि त्यांच्या मुलांमध्ये असणारी मैत्री ही कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरते. सध्याच्या घडीला कलाविश्वात या सेलिब्रिटी कीड्सची बरीच चलती पाहायला मिळत आहे. यातच बिग बी अमिताब बच्चन यांची नात, म्हणजेच त्यांच्या मुलीची मुलगी नव्या नवेली आणि अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिझान यांच्या खास मैत्रीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
'मलाल' या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच मिझान आणि बिग बींच्या नातीचं रिलेशनशिप या चर्चांना अधिक वाव देऊन गेलं. किंबहुना स्वत: मिझाननेच एका मुलाखतीदरम्यान, आपण कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं म्हटलं होतं. पण, आता व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे नव्या आणि मिझानच्या मैत्रीपूर्ण नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी कलाविश्वात ३३ वर्षांची कारकिर्द पूर्ण करण्याच्या निमित्ताने एका फ२शन शोचं आयोजन केलं होतं. दीपिका पदुकोण या शोमध्ये शो स्टॉपर होती. अतिशय रंगतदार अशा या फॅशन शोच्या शेवटी ज्यावेळी सर्वच मॉडेल, कलाकार रॅम्पवर आले तेव्हा प्रेक्षकांमध्ये पहिल्याच रांगेत बसलेल्या जया बच्चन या मोठ्या उत्साहात मिझानकडे गेल्या आणि शाबासकी देत त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली.
आपल्याला मिळणारी ही दाद मिझानला अर्थातच खास वाटली असणार यात शंका नाही. मिझानचं कौतुक केल्यानंतर जया बच्चन यांनी इतरही कलाकारांचं कौतुक केलं. फॅशन शोदरम्यान, नव्याच्या आजीशी असणारं मिझानचं हे आपुलकीचं नातं पाहता बहुचर्चित जोड्यांमध्ये आता नव्या- मिझानचं नावहगी जोडलं जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.