सायली पाटील, झी मीडिया, मुंबई :
दिग्दर्शक : डॉ. सलील कुलकर्णी
निर्माते : गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी
मुख्य भूमिका : मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार
संगीत दिग्दर्शन, कथा, पटकथा : डॉ. सलील कुलकर्णी
लग्न... नात्यांचे बंध, रुसवेफुगवे आणि अर्थातच खुप सारं प्रेम. बरं या साऱ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय असं तुम्हालाही वाटतंय ना?..... हो! अगदी बरोबर. हल्लीच्या दिवसांमध्ये लग्न म्हटलं की त्या सुरेख क्षणांच्या, विविध समारंभांच्या आठवणी एका काही मिनिटांच्या ध्वनीचित्रफीतीच्या अर्थात व्हिडिओच्या स्वरुपात साठवून ठेवण्यालाही अनेकांचच प्राधान्य असतं. आठवणींचा हा सुरेख ठेवा जपण्याची अशीच एक कल्पना 'परी' नावाच्या एका शिकाऊ डॉक्टरच्या मनात येते. मुळची मुंबईची असणारी ही 'डॉक्टर परी' सासवडच्या एका मुलाच्या प्रेमात पडते, त्याच्यावरील प्रेमाची कबुली देते आणि अवघ्या दोन महिन्यांच्या ओळखीवर ही जोडी थेट लग्नाच्याही निर्णयापर्यंत पोहोचते. त्यांच्या याच प्रवासाचा धावता आढावा घेण्यासाठी मग घाट घातला जातो जो 'वेडिंगचा शिनेमा' म्हणून आपल्या समोर येतो.
संगीत, गायन, संगीत दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये नावारुपास आलेल्या डॉ. सलील कुलकर्णी यांनी वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुक्ता बर्वे, भाऊ कदम, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या कलाकरांना एकत्र आणत त्यांनी दोन अशा कुटुंबांची कहाणी अगदी सोप्या, हलक्याफुलक्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
प्रवीण तरडे, भाऊ कदम आणि संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांच्या विनोदी अंदाजाचा वापर करत चित्रपटात साकारण्यात आलेले प्रासंगिक विनोद प्रेक्षकांना अनेक दृश्यांमध्ये खळखळून हसवतात. तर, शिवराज वायचळ आणि ऋचा या दोघांचीही केमिस्ट्रीही कथानकाच्या अनुषंगाने साजेशी वाटते. अर्थात याला काही दृश्य अपवाद आहेत. चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे ही एका होतकरु दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. जी तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलान मनाविरुद्ध एका अशा प्रोजेक्टचा भाग होऊन जाते जो प्रोजेक्ट तिला अशा काही व्यक्तींशी गाठ घालून देतो जे तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास कारणीभूत ठरतात.
'वेडिंगचा शिनेमा'च्या निमित्ताने मुक्ताने साकारलेली उर्वी ही भूमिका पाहताना ही तिच का मुक्ता.... असं राहून राहून लक्षात येतं. तिच्या बोलण्याचा अंदाज आणि कॅमेरापुढे असणारा वावर पाहताना नकळतपणे पुढे जाणारा हा चित्रपट पुढे काय होणार याविषयी काहीसा अंदाज वर्तवण्यास आणखी सोपा होत जातो. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोघांमध्ये काही गंभीर दृश्यही समोर येतात, पण अर्थातच ती दृश्य कथानकात अडचणी निर्माण करत नाहीत.
चित्रपटाच्या इतर विभागांविषयी सांगावं तर, वेषभूषा आणि केशभूषेच्या बाबतीत आणखी काही नवे प्रयोग करता येणं शक्य होतं असं जाणवतं, शिवाय काही दृश्यांमध्ये सहकलाकारांचा अभिनयही खटकणारा ठरतो. पण, भाऊ, प्रवीण तरडे यांसारखे कलाकार त्याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडतात किंवा विसर पाडतात असं म्हटलं तरी हरकत नाही. 'वेडिंग फिल्म'चा ट्रेंड आणि त्यातून उलगणारी नाती ही कित्येकदा बरीच वेगळी असतात, आता त्यातील हे वेगळेपण नेमकं का आणि कधी समोर येतं या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच लक्षात येईल. त्यामुळे लग्नसराईच्या या धमाल वातावरणात भावनांचे टेक, परिस्थितीचे रिटेक घेत साकारण्यात आलेला 'वेडिंगचा शिनेमा' एकदा जरुर पाहा.
तीन स्टार
- सायली पाटील
(SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com)