Abhijeet bichukle In Khupte tithe gupte : प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या (Khupte tithe gupte) कार्यक्रमातील तिसऱ्या पर्वाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. राजकीय नेते तसेच मराठी कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावल्याने कार्यक्रमाची चर्चा होताना दिसत आहेत. अशातच आता या पर्वाच्या आगामी भागात बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळवणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet bichukle) हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आता हा एपिसोड देखील प्रचंड गाजणार असल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमातील काही प्रोमो झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी राजकारणावर देखील भाष्य केलं.
अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरून बिचुकले यांना सवाल विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. तुम्ही थेट आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लोक म्हणतात की अभिजीत बिचुकले यांना जिंकायचं नसतं तर फक्त चर्चेत राहायचं असतं, असं अवधूत गुप्ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर बिचुकले चांगलेच संतापले.
हे बघा, तुम्हाला जर चर्चेत राहायचं असेल तर तुम्ही जा, तुम्ही चर्चेत राहा. तुमच्यात काही दम नाही का? उद्धव दादांचे आणि माझे चांगले संबंध आहेत म्हणून मी निवडणूक लढवली. त्यावेळी गुप्तेनी गुगली फेकली. तुमचे आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत, तर तुम्ही आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक का लढवली? असा सवाल विचारला गेल्यावर बिचुकले यांनी बचावात्मक उत्तर दिलं. मी निवडणुकीत लोकशाहीने गेलो होतो. मी त्यांचा मिंदा नाही, असं काही झालं की माझ्यामुळे आदित्य ठाकरेंचं नाव झालं, असं म्हणत बिचुकलेंनी खळबळ उडवून दिली.
उद्धवदादा मला कलाप्रेमी आणि भोळे आहेत. लोकांनी ठरवायचं की उद्धवदादा नेते आहेत की नाही. मी गेल्या जन्मी राजा होतो, आत्ताही माझा तोरा तसाच असतो, मी कोणाही जवळ करत नाही. मी कोणाचाही मिंदा नाही. ना मी सातारच्या राजघराण्याचा मिंदा आहे, ना मी ठाकरे परिवाराचा मिंदा आहे, असं म्हणत बिचुकलेंनी राजकारणाच्या प्रश्नांवर टोले लगावले आहेत.