झी टॉकीजवर महाराष्ट्र दिन विशेष फिल्म फेस्टिवल

रंगणार खास सिनेमाचा सोहळा 

Updated: Apr 28, 2021, 02:33 PM IST
झी टॉकीजवर महाराष्ट्र दिन विशेष फिल्म फेस्टिवल

मुंबई : शिवरायांसारखा प्रेरणादायी आदर्श राजा, संत आणि ग्रंथांचे संस्कार, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण, खाद्यसंस्कृतीचं वैभव इथपासून ते आधुनिक महाराष्ट्राचे चेहरे असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र.

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आताच्या घडीला करोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर घोंगावत असल्यामुळे सर्वांनी घरीच राहून महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हा खास दिवस प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी महाराष्ट्राची लाडकी चित्रपट वाहिनी झी टॉकीज ब्लॉकबस्टर चित्रपट सादर करणार आहे. मराठी अस्मिता आणि अभिमान ज्यातून झळकेल असे हे चित्रपट यावर्षी महाराष्ट्र दिवस निमित्ताने झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचं दर्शन घडवणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट सकाळी ९ वाजता, तर ज्या चित्रपटाचे संवाद ऐकून अंगावर शहारे येतात असा महेश मांजरेकर यांचा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' हा चित्रपट दुपारी ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

दुपारी १.३० वाजता स्वामींची महती सांगणारा 'देऊळ बंद' आणि ४ वाजता रितेश देशमुख याचा लय भारी हा चित्रपट प्रसारित होईल. संध्याकाळी ७ वाजता मुळशी पॅटर्न हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तसेच या खास दिवसाचा शेवट सांगीतिक करण्यासाठी शिंदे घराण्याचा शिंदेशाही हा खास कार्यक्रम रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांसाठी सादर होईल. तेव्हा हा महाराष्ट्र दिवस अजून खास बनवण्यासाठी पाहायला विसरू नका झी टॉकीज