130 दिवसांची झुंज; जगण्याच्या प्रबळ इच्छेने कोरोनावर मात

4 महिन्यांहून अधिक दिवस सीसीयू म्हणजेच क्रिटीकल केअर युनिटमध्ये असलेल्या रूग्णाने अखेर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली आहे.

Updated: Sep 18, 2021, 07:28 AM IST
130 दिवसांची झुंज; जगण्याच्या प्रबळ इच्छेने कोरोनावर मात

मेरठ : गेल्या दीड वर्षांपासून सर्वजण कोरोनाचा सामना करतायत. कोरोनाच्या या महामारीत देशात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आणि अनेक मुलं अनाथही झाली. मात्र अशातच एक चांगली बातमी मेरठमधून समोर आली आहे. जवळपास 4 महिन्यांहून अधिक दिवस सीसीयू म्हणजेच क्रिटीकल केअर युनिटमध्ये असलेल्या रूग्णाने अखेर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली आहे.

मेरठमध्ये सुमारे 130 दिवस सीसीयूमध्ये राहिल्यानंतर आता रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. त्यानंतर त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.

विश्वास सैनी असं या रूग्णांचं नाव आहे. 39 वर्षांचे विश्वास मेरठमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर त्यांनी 28 एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी करून घेतली. ज्यामध्ये त्याच्या कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला त्यांच्यावर उपचार घरीच करण्यात आले. नंतर, जेव्हा त्याची प्रकृती खालावली तेव्हा त्याला मेरठच्या नुटेमा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

40 दिवस वेंटिलेटरवर

रुग्णालयात दाखल केल्यानंतरही विश्वासच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. विश्वास यांना सुमारे 40 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान, डॉक्टरांच्या टीमने त्याच्यावर सतत देखरेख ठेवली.

रूग्णालयातील सीसीयू विभागाचे प्रमुख डॉ. अवनीत राणा यांनी सांगितलं की, विश्वास सैनी यांची फुफ्फुस डॅमेज झाली होती. शिवाय त्यांची ऑक्सिजन लेवल देखील खालावली होती. आम्हाला भीती या गोष्टीची होती की त्याला ब्लॅक फंगसचा धोका उद्भवू नये. 

मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे या रूग्णाला वाचवण्यात यश आलं आहे. सध्या रूग्णाला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.