मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट व्यक्तींच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे व्यस्त वेळापत्रकामुळे रोजच्या आहारात देखील सतत बदल होत असतात. परिणामी शरीराचे वजन वाढते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक अनेक पार्यायी मार्ग अवलंबतात. त्यापैकी एक म्हणजे सर्जरी करून वजन कमी करणं.
पण या पर्यायाचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्जरीस 'बॅरिएट्रिक सर्जरी' म्हणून संबोधले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, संतुलित जीवन, पोषक तत्वांचे सेवन त्याचप्रमाणे नियमत व्यायाम केल्यानंतर या सर्जरीचा धोका टळू शकतो.
'बॅरिएट्रिक सर्जरी' वजन कमी करण्यासाठी केली जाणारी एक शस्त्रक्रिया आहे. मोठ्या काळापासून लठ्ठपणाला ग्रासलेले, उच्च रक्तदाब, उच्च कॅलेस्ट्रोल असलेल्या व्यक्तींना ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
पाहायला गेलं तर, 'बॅरिएट्रिक सर्जरी' प्रमाणे अनेक सर्जरी आहेत. रॉक्स-एन-व्हाय गॅस्ट्रिक बायपास, व्हर्टिकल स्लिव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक एडजेस्टेबल गॅस्ट्रिक बँडिंग या तीन सर्जरी करण्याचा सल्ला सर्जन कायम देतात.
या सर्जरी नंतर भूक कमी लागते त्यामुळे लोकांचं आहार कमी होतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष देणं फार महत्तवाचं आहे.