Salt Benefits : मीठाचा हात योग्य तिच खरी सुगरण... किंवा जी व्यक्ती जेवणात मीठ प्रमाणात टाकते त्याच व्यक्तीचं जेवण उत्तम होतं असं पूर्वापार आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी म्हणत आली आहेत. तुम्हीही हे सर्व कधी ना कधी ऐकलं असेलच. जेवणाची चव वाढवण्यासाठी किंबहुना जेवणाला चवदार करण्यासाठी चिमुटभर मीठ कमालीची जादू करून जातं. हो, पण ते योग्य प्रमाणात पडणंही तितकंच महत्त्वाचं.
हल्ली बाजारात मीठ आणायला गेलं की, तिथंही अनेक प्रकार आपल्यापुढं ठेवले जातात. टेबल सॉल्टपासून काळं मीठ, सैंधव मीठ हे आणि असे अनेक प्रकार मीठातही पाहायला मिळतात. काही मंडळींसाठी पांढऱ्या मीठाव्यतिरिक्त मीठाचे इतर प्रकारच नियमीत वापराचे. काही मंडळींसाठी उपवासाचा दिवस म्हणजे सैंधव मीठाचा वापर असं एकंदर समीकरण. पण, आरोग्यासाठी नेमकं फाद्याचं काय? त्यातही उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी कोणत्या मीठाचं सेवन करावं?
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, मीठामध्ये असणाऱ्या सोडियममुळं शरीरातील सोडियमची पातळीसुद्धा संतुलित राहते. पण उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपी असणाऱ्या रुग्णांना मात्र सोडियमचं अधिक प्रमाण धोक्याचं असतं. शरीराच्या दृष्टीनं या घटकामध्ये संतुलन राखणं कायमच फायद्याचं. ज्यामुळं शरीरात इलेक्ट्रिकल प्रमाण योग्य ठेवण्यात याची मदत होते.
मेंदूजवळील पेशींसाठीही मीठ फायद्याचं. मीठाचं प्रमाण गरजेहून कमी झाल्यास व्यक्ती कोमात जाण्याची भीती असते, त्यामुळं योग्य प्रमाणात योग्य प्रकारच्या मीठाचं सेवन करणं अतिशय महत्त्वाचं.
सैंधव मीठामध्ये सोडियमचं प्रमाण अतिशय कमी असतं. ज्यामुळं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते. शिवाय यामध्ये असणाऱ्या सोडियममुळं रक्तपेशींचं नुकसान होत नाही. ज्यामुळं हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाबाची समस्याही भेडसावत नाही. सैंधव मीठामुळं शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ज्यामुळं याचं सेवन फायद्याचं.
काळ्या मीठाच्या बाबतीत म्हणावं तर, पोटाच्या समस्यांवर उपाय म्हणून त्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या मीठामुळं डाइजेस्टिव एंजाइम्सला चालना मिळते आणि यामुळं अपचन, गॅस आणि तत्सम पोटांच्या विकारांपासून आराम मिळतो. त्यामुळं आपल्या शरीराच्या गरजा आणि एकंदर गोष्टी लक्षात घेता मीठाचीही निवड करा, त्यासाही आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचाही सल्ला घ्या.
(वरील माहिती सर्वसामन्य संदर्भांवर आधारित असून, कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)