कोरोनाच्या उपचारांसाठी आता 'या' औषधांची गरज नाही; सरकारने जारी केली नवी गाइडलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनावरील उपचारांसंदर्भातील गाइडलाईन्समध्ये बदल केलेत.

Updated: Jun 7, 2021, 04:01 PM IST
कोरोनाच्या उपचारांसाठी आता 'या' औषधांची गरज नाही; सरकारने जारी केली नवी गाइडलाईन्स title=

मुंबई : संपूर्ण भारताने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला. मात्र आता कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं दिसून येतंय. यासाठीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनावरील उपचारांसंदर्भातील गाइडलाईन्समध्ये बदल केलेत. या बदलांमध्ये लक्षणं विरहित आणि सौम्य लक्षणं असलेल्यांना एंटीपीयरेटिक (तापासाठी) आणि एंटीट्यूसिव (थंडी भरून आल्यास) या औषधांना सोडून बाकी सर्व औषधांना हटवण्यात आलं आहे. 

नव्या गाइडलाईन्सप्रमाणे, गरजेचं नसल्यास रूग्णांना सीटी स्कॅन न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाइडलाइन्समध्ये बॉडी हायड्रेशनसोबत योग्य आहारावर भर देण्यात आला आहे. 

डॉक्टर, जी औषधं लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांनाही लिहून देत होते अशी औषधं 27 मे रोजी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमधून काढली काढून टाकण्यात आली आहेत. या औषधांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सिसाइक्लिन, झिंक, मल्टीविटॅमिन यांचा समावेश आहे. लक्षणं नसलेल्या कोरोना रूग्णांना यापैकी कोणत्याही औषधाची गरज नसल्याचं गाइडलाईन्समध्ये म्हटलं आहे. 

कोणतं औषधं कधी घ्यायचं?

ज्या रूग्णांना सौम्य लक्षणं आहेत त्यांना ताप येणं, श्वास लागणं तसंच ऑक्सिजन लेवल यावर स्वतः लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर नव्या सरकारच्या गाइडलाईन्सप्रमाणे, कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर रूग्ण एंटीपायरेटिक आणि एंटीट्यूसिव  (Antipyretic and Anti-tussive) ही औषधं घेऊ शकतात. तसंच खोकल्याचा त्रास होत असल्यास 5 दिवस दिवसांतून 2 वेळा बुडेसोनाइडचा 800 एमसीजी डोज घेऊ शकतात.