Tomato flu origin and symptoms: कोरोना (Corona), ओमायक्रॉन (Omicron), मंकीपॉक्सनंतर (Monkeypox) आणि स्वाइन फ्लूनंतर (Swine Flu) देशात आता नव्या आजाराचा धोका वाढलाय. या आजाराचं नाव आहे टोमॅटो फ्लू. लॅसेंट जनरलने (Lancet General) एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात भारतात टोमॅटो फ्लू (Tomato flu) हा आजार हातपाय पसरत असल्याचं म्हटलं आहे.
देशात आतापर्यंत 80 जणांना टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये (Keral) या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे.
लहान मुलांमध्ये दिसतात अशी लक्षणं
कोरोना, मंकीपॉक्सनंतर भारतात टॉमॅटो फ्लू या नव्या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. केरळमध्ये 5 वर्षांच्या एका मुलामध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणं आढळून आली. या आजारात मुलांमध्ये तापासह अंगावर लाल पुरळ उठतात, जे टोमॅटोसारखे दिसतात. साधारणपणे हा आजार अशा मुलांमध्ये दिसून येतो ज्यांना अलीकडे डेंग्यू किंवा चिकनगुनिया झाला आहे आणि ते त्यातून बरे होत आहेत. या आजारात तापासोबत थकवा, लाल पुरळ, सांधेदुखी होऊ शकते.
टोमॅटो फ्लू किती धोकादायक?
या आजारासंदर्भात रेनबो हॉस्पीटलचे डॉक्टर पवन कुमार यांनी माहिती दिली आहे. टोमॅटो फ्लू हा आजार मंकीपॉक्सपेक्षा खूप वेगळा आहे, आणि हा कमी धोकादायक आहे. योग्य औषधं आणि उपचार घेतल्यास टोमॅटो फ्लू हा आजार 5 ते 7 दिवसात ठिक होतो. हा आजार एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला होऊ शकतो, तसंच मुलांकडून मोठ्या व्यक्तींना याची लागण होण्यची शक्यता फारच कमी आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते हा कोणताही मोठा आजार नाही, टोमॅटो फ्लू हे केवळ नाव देण्यात आलं आहे.
टोमॅटो फ्लू नवा आजार नाही
लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरमध्ये हा नवीन आजार असल्याचं कुठेही सिद्ध होत नाही. डॉक्टरांच्या मते, हा एक हात, पाय आणि तोंडाचा आजार आहे जो लहान मुलांमध्ये आढळतो आणि टोमॅटो फ्लू हा त्याचा एक प्रकार असू शकतो. भारतातील प्रत्येक भागात हा आजार आधीच मुलांमध्ये आढळून आला आहे.
अहवालानंतर टोमॅटो फ्लूचं पहिलं प्रकरण 6 मे रोजी केरळतल्या कोल्लम भागात आढळून आलं होतं. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात देशभरात 82 मुलांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केरळबरोबरच ,तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशातही काही या आजाराची लागण झालेली काही मुलं आढळून आली आहेत.
हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही तसंच मंकीपॉक्ससारखा जीवघेणाही नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आजाराची लागण झाल्यास मुलांना शक्य तितका आराम द्यावा, शाळा किंवा खेळायला पाठवू नये आणि मुलांना भरपूर पाणी प्यायला द्यावं अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.