Female Infertility : महिलांमधील वंध्यत्वाची कारणं काय? लक्षणं पाहून वेळीच सावध व्हा

Female Infertility : मागील काही वर्षांमध्ये जीवशैलीमध्ये झालेल्या बदलांचे थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे वंध्यत्वं.   

सायली पाटील | Updated: Mar 21, 2024, 02:48 PM IST
Female Infertility : महिलांमधील वंध्यत्वाची कारणं काय? लक्षणं पाहून वेळीच सावध व्हा title=
Female Infertility Symptoms and Causes and remedies

Female Infertility : मातृत्त्वं म्हणजे दुसरा जन्म, किंवा मातृत्त्वाचं सुख महिलेला खऱ्या अर्थानं परिपूर्ण करतं असं अनेकदा म्हटलं जातं. पण, सर्वच महिलांच्या नशिबात हे सुख किंवा त्यांच्या जीवनात हा टप्पा येतोच असं नाही. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही मूल न झाल्यामुळं बऱ्याच महिला वैद्यकिय उपचार सुरु करतात, अनेकदा आयवीएफ किंवा तत्सम पर्यायांचीही चाचपणी केली जाते. पण, निराशा इथंही अनेकांची पाठ सोडत नाही. 

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर इच्छा असतानाही अपत्यप्राप्ती न होणाऱ्या जोडप्याला काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे इनफर्टिलिटी अर्थात वंध्यत्व. कोणत्याही गर्भनिरोधकाचा वापर न करताही गर्भधारणा न होण्याची बाब आढळल्यास ही परिस्थिती वंध्यत्वाकडे खुणावते. फक्त महिलाच नव्हे, तर यासाठी पुरुषही कारणीभूत असू शकतात. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात सध्याच्या घडीला 15 टक्के नागरिक या समस्येशी सामना करत असले तरीही बरीच जोडपी यासंदर्भात मोकळेपणानं संवाद साधत नाहीत. 

महिलांमध्ये काय आहेत वंध्यत्वाची कारणं? 

- फॅलोपिन ट्यूबमध्ये टीबी होणं 
- गर्भाशयाचे विकार 
- फॅलोपिन ट्यूब निष्क्रीय असणं
- शरीरातील हार्मोन असंतुलित असणं 
- ओवरी योग्यरित्या काम न करणं 

वंध्यत्व आणि उपचार 

लग्नानंतर किंवा बाळ होण्याची इच्छा असतानाही कैक प्रयत्नांनंतरही गर्भधारणा न होण्याची परिस्थिती उदभवल्यास ते जोडपं वंध्यत्वाचा सामना करत असल्याचं स्पष्ट होतं. वंध्यत्वावर आज जगभरात कैक उपचार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रचंड पुढे आल्यामुळं ही मोठी दिलासायक बाब ठरते. पण, या साऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जोडीदाराचा पाठींबा आणि वस्तुस्थिती स्वीकारण्याची मनस्थिती. 

हेसुद्धा वाचा : Crime News : शीतपेयातून गुंगीचं औषध देत तरुणीचं अपहरण; लग्न करत शरीरसुखाची मागणी अन्... 

महिलांच्या बाबतीत सांगावं तर, मासिक पाळीमध्ये असह्य वेदना होणं, अधिक रक्तस्त्राव होणं, पाळीदरम्यान ताप येणं, पाठीखालच्या भागात असह्य वेदना होणं, योनीतून स्त्राव होणं अशा समल्या आढल्यास ही एंडोमेट्रिओसिसची प्राथमिक लक्षणं असू शकतात. त्यामुळं अशा वेळी वैद्यकिय सल्ला घ्यावा. धकाधकीच्या आयुष्यात चांगल्या जीवनशैलीला प्राधान्यस्थानी ठेवत रोजच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणल्यास आरोग्याला यामुळं चांगला फायदा होतो आणि वंध्यत्वाची समस्या दूर राहते. बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांनी वैद्यकिय सल्ल्यानंतर वंध्यत्व आणि तत्सम समस्यांसंदर्भातील काही चाचण्या करून घेणंही अशा वेळी फायद्याचं ठरतं. 

(वरील मुद्दे सर्वसामान्य संदर्भ आणि उपलब्ध माहितीआधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही. कोणत्याही निर्णयाआधी वैद्यकिय सल्ला अवश्य घ्यावा. )