तिसऱ्या लाटेसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा; कोरोना टास्क फोर्सची माहिती

यापुढे सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं लागणार असल्याचं महाराष्ट्र टास्क फोर्सचं म्हणणं आहे.

Updated: Aug 26, 2021, 09:48 AM IST
तिसऱ्या लाटेसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा; कोरोना टास्क फोर्सची माहिती title=

मुंबई : कोरोनाच्या काळात आपण अनेक निर्बंधांचं पालन केलं. यामध्ये मास्क आणि सॅनिटाझरचा वापर तसंच सोशल डिस्टंसिंग यांचं पालन केलं गेलं. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे यापुढे सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं लागणार असल्याचं महाराष्ट्र टास्क फोर्सचं म्हणणं आहे.

डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजेच किमान पुढचे 14 महिने सोशल डिस्टस्टिंग पाळणं शिवाय मास्कचा वापर करणं बंधनकारक असल्याचा इशारा राज्य टास्क फोर्सकडून देण्यात आला आहे. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देऊन दिलेल्या निर्बंध शिथिल केल्याचा गैरवापर करू नये.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 103वर पोहोचली आहे. त्यामुळे बारकाईनं लक्ष ठेवण्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

राज्यातील 24 जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या कोरोनाच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाला आहे. यात 50 टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागातले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आढळले असले तरी त्या तुलनेत इथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दुसरीकडे भारतातील कोरोनाव्हायरसचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागलंय. गेल्या 2 दिवसात नवीन प्रकरणांमध्ये 21 हजारांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड -19 ची 46397 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर यापूर्वी मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती.