मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तर आता नुकतंच लसीचे दोन घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुदत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मॉल आणि उपहारगृहांमध्ये लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.
कोव्हिशिल्डच्या दोन डोसांमध्ये 84 दिवसांचं अंतर आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसातील अंतरामध्ये 28 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा डोस लवकरात लवकर पूर्ण होतो. यामुळे दोन्ही डोस लवकर पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक कोव्हॅक्सिन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
सरकारी लस केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध नाहीये. अशी परिस्थिती असली तरीही लोकं खाजगी लसीकरण केंद्रांची वाट धरत असल्याचं समोर आलं आहे. नाईलाजाने नागरिकांना लसीच्या दोन डोसांसाठी 2700 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयातील कोव्हॅक्सिनचे लसीकरण वाढले आहे.
दरम्यान, लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे कोरोना लस कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर कमी केले जाऊ शकते. हे अंतर कमी करण्याची सूचना IAPSM म्हणजेच इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने केली आहे.
या संदर्भात IAPSM चे म्हणणे आहे की केंद्र सरकार या प्रकरणाचा विचार करत आहे. सध्या देशात 59 कोटींपेक्षा जास्त लस डोस (Vaccine Dose) देण्यात आले आहेत आणि लसीकरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आता दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांवरून 8 आठवड्यांपर्यंत कमी करण्याचा विचार केला जात आहे. IAPSM ने कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला सूचवलं आहे.