सतत पाय दुखणं आरोग्यास ठरू शकतं घातक

आपले पाय देखील आपल्या आरोग्याची माहिती देतात.

Updated: Sep 25, 2019, 06:13 PM IST
सतत पाय दुखणं आरोग्यास ठरू शकतं घातक

मुंबई : आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. या स्पर्धेच्या युगात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्याचप्रमाणे आपले पाय देखील आपल्या आरोग्याची माहिती देतात

पाय थंड पडणं :  पाय सतत थंड पडल्याचे जाणवत असतील तर हे रक्तपुरवठा योग्यरित्या न होत असल्याचं लक्षणं आहे. शरीरात योग्यरित्या रक्तपुरवठा न होण्यास धुम्रपान, उच्च रक्तदाब तसंच हृदयाचे आजार हे घटक कारणीभूत असू शकतात. 

पायदुखी : जर तुम्हाला पायदुखीचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुमच्या चपला जबाबदार ठरू शकता. अनेक महिलांना त्यांच्या चपलांमुळे पायदुखीचा त्रास होत असतो. हिल्स घातल्याने पायातील हाडाला छोटा क्रॅक जातो. परिणामी पाय दुखीची समस्या उद्भवते.

पायांची बोटं पांढरी किंवा लाल होणं : रेनॉड सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तींची पायांची बोटं लाल किंवा पांढरी होतात. रेनॉड सिंड्रोममध्ये शरीरातील काही भाग बधीर झाल्यासारखा वाटतो. 

पायांची आग होणं : पायांची आग होणं किंवा पाय गरम झाल्यासारखं जाणवणं हे मधुमेही रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. शरीरात व्हिटॅमिन बी कमी असणं, किडनीचे आजार, पायांमध्ये योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नसल्यास ही समस्या जाणवू शकते.

पायाचा अंगठा दुखणं : पायाच्या अंगठ्यामध्ये अचानक वेदना जाणवण्यास सुरुवात झाली तर ते ऑस्टिओआर्थरायटीसचं लक्षण असू शकतं. अंगठा लाल होणं आणि त्याला सूज येणं हे ऑस्टिओआर्थरायटीसचं लक्षणं मानलं जातं.