मुंबई महापालिकेचा पालकांना मोठा दिलासा; घेतला हा मोठा निर्णय

 संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून सतत वर्तवण्यात येतोय.

Updated: Sep 9, 2021, 11:13 AM IST
मुंबई महापालिकेचा पालकांना मोठा दिलासा; घेतला हा मोठा निर्णय title=

मुंबई : राज्यातून अजून कोरोनाचं संकट दूर झालेलं नाही. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून सतत वर्तवण्यात येतोय. या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याचंही म्हटलं जातंय. अशातच मुंबई महापालिकेने एक चांगला आणि मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या म्हणण्याप्रमाणे, लहान मुलं दाखल असलेल्या कोविड सेंटरमध्ये पालकांना राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 

लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची वेळ आली तर पालकांनी काय करायचं असा प्रश्न अनेकांसमोर होता. यावर मुंबई पालिकेने आता मोठा दिलासा दिला आहे. पालिका प्रशासनाने पालकांना त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही जंबो कोविड उपचार केंद्रामध्ये केली आहे.

ज्या पालकांना कोरोनाची लागण झालेली नसेल त्यांना काही अंतरावर तर, जे पालक बाधित असतील त्यांना संसर्ग झालेल्या मुलांसोबत राहता येणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या मुलांची काळजी पालकांना वाटणं स्वाभाविक असल्याने त्यांची हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या या निर्णयानुसार, बीकेसी, दहिसर तसंच मुलुंड कोरोना उपचार केंद्रामध्ये ही उपाययोजना करण्यात आली आहे. पालकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या या रूम्समध्ये पाणी तसंच इतर काही महत्त्वाच्या सुविधांची उपलब्धताही करण्यात येणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बालरोगतज्ज्ञांनी मुलांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास सांगितलं तर त्यांच्यासोबत एका पालकाला मुलांसोबत राहता येईल का, अशी विचारणा मुलांसाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांकडे सातत्याने होत होती.

तर दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित झालेल्या मुलांच्या संख्येत महिन्याभरात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. आकडेवारी पाहिली तर जुलैपर्यंत 10 वर्षांखालील 2 लाख 18 तर 11 वर्षांवरील 4 लाख 63 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 वर्षांवरील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण अधिक आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. 6 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, 10 वर्षांखालील 6738 लहान मुलांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या बालकांच्या संख्येत 3.36 टक्क्यांनी वाढ झाली. तर 11 वर्षांवरील वयोगटात 18 हजार 413 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. गेल्या महिनाभरात एकूण 25,151 मुलांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.