या '6' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आमचूर पावडर आहारात हवीच !

आमचूर पावडर म्हणजे कैरी सुकवून केलेली पावडर. 

Updated: Apr 10, 2018, 07:41 AM IST
या '6' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आमचूर पावडर आहारात हवीच ! title=

मुंबई : आमचूर पावडर म्हणजे कैरी सुकवून केलेली पावडर. आंबा फक्त उन्हाळ्यात उपलब्ध असतो. मात्र  फळांचा राजा असलेल्या आंब्याचा वर्षभर आस्वाद घेण्यासाठी तो लोणची, मुरंबा, रस किंवा पावडर अशा विविध स्वरूपात साठवला जातो. चटकदार आमचूर पावडर ही आमटी व विविध भाज्यांमधून आहारात समाविष्ट केली जाते.  आमचूर पावडर हिरव्या किंवा तपकिरी रंगाची असते.

कशी बनवाल आमचूर पावडर 

आजकाल बाजारात आमचूर पावडर सहज उपलब्ध होते. मात्र घरच्या घरी देखील तुम्ही आमचूर पावडर बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता.  आमचूर पावडर बनवण्यासाठी कच्च्या कैर्‍या सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे कडक सुर्यप्रकाशात वाळवा. साठवणूकीसाठी पावडर करणार असाल तर कैरीच्या फोडींना हळद लावून त्या नीट सुकवा. हळदीमुळे बुरशी व जंतूंचा संसर्ग होत नाही.  फोडी पुरेशा सुकल्यानंतर त्याची पावडर करा व हवाबंद डब्यात साठवून  ठेवा. आमचूर पावडर चटणी, भाज्या, आमटी याचबरोबर चिकन व माश्यांचे सार यासारख्या मासांहारी पदार्थांचीही चव वाढवते.

आमचूर पावडरचे फायदे

पचनशक्ती सुधारते

आमचूर पावडर पित्त कमी करते व पचनक्रियेला चालना देते. आमचूर पावडरचा आहारात समावेश केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते व पोट साफ होण्यास मदत होते.  पचनमार्गाचे कार्य सुरळीत करून निरोगी स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी आमचूर पावडर अतिशय उपयुक्त आहे.

वजन घटवण्यास मदत करते

वजन घटवण्यासाठी आमचूर पावडर फारच परिणामकारक आहे. त्यातील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक चयापचनाची क्रिया सुरळीत करून वजन घटवण्यास मदत करतात. आमचूर पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

डोळ्यांचे आरोग्य राखते

आमचूर पावडरच्या सेवनाने डोळ्यांची क्षमता सुधारते.  आहारात आमचूर पावडरचा सामवेश केल्याने डोळ्यांचे विकार होत नाहीत. मोतिबिंदू होण्यापासूनही तुमचे रक्षण होते.

कर्करोगापासून बचाव होतो

आमचूर पावडरच्या सेवनाने, तुमचे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून रक्षण होऊ शकते. त्यात ‘व्हिटामिन सी’ मुबलक प्रमाणात असल्याने आरोग्य सुधारते.  रोज सकाळी गुळ व आमचूर पावडर रिकाम्यापोटी घेणे उत्तम !

त्वचेचा पोत सुधारतो

आमचूर पावडर त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही मदत करते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?  आमचूर पावडर त्वचेतील छिद्र मोकळी करतात , मळ व तेलकटपणा दुर होतो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. 

हृदयाचे आरोग्य सुधारते

आमचूर पावडर हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, हृदय कमकुवत होणे अशा समस्या कमी होतात.