मुंबई : सध्या बहुतांश जणांना अॅसिडीटीची समस्या जाणवते. अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. एक चांगली जीवनशैली जोपासण्यासाठी वेळच्या वेळी जेवण, जेवणाची योग्य पद्धत, जेवणानंतर अर्धा तास सरळ बसणं तसंच नियमित व्यायाम या सर्व गोष्टींचा अवलंब करणं गरजेचं आहे. याच व्यतिरीक्त काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
ओवा- ओटीपोट किंवा पोटाच्या तक्रारींसाठी ओवा खूप फायदेशीर ठरतो. ओवा पचनाचं कार्य सुरळीत करण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. ओव्यामध्ये थाइमोल असतं. ओवा तुम्ही एका चिमुटभर मीठासोबत खाऊ शकता. त्याचप्रमाणे रात्री झोपताना पाण्यात एक चमचा ओवा घालून सकाळी त्या पाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे पोटासंबंधीच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतो.
बडीशेप- जेवणानंतर एक चिमुटभर बडीशेप खाणं ही जणू भारतीय कुटुंबातील परंपरा मानली जाते. बडीशेप तोंडाची दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीराचं पचनकार्य निरोगी ठेवण्यास मदत करते. बडीशेपचं सेवन विविध प्रकारे केलं जाऊ शकतं. जसं की, रात्रभर पाण्यात भिजवून बडीशेपचं सेवन, चहामध्ये बडीशेपचा वापर शिवाय गरम पाण्यासोबतही बडीशेपचं सेवन करू शकतो. स्वादासाठी यामध्ये साखरेचाही वापर करू शकतो.
मध- एका संशोधनानुसार, एक चमचा मध गरम पाण्यात मिक्स करून त्याचं सेवन केल्यास अॅसिडीटीपासून आराम मिळण्यास मदत मिळते. यामध्ये थोडं लिंबू पिळल्यास ते एक अल्कालिसिंग घटक तयार होतं जे अॅसिडीटीला मारक ठरतं.
दूध आणि दही- अॅसिडीटीला दूर ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे दूध. ठंड किंवा कमी तापमानाचं दूध त्वरीत अॅसिडीटीपासून आराम देतं. दूध एक नैसर्गिक अँटासिड असून ते अॅसिडिटीला नैसर्गिकरित्या कमी करतं. दही देखील अॅसिडीटीला नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. दही प्रोबायोटीक असल्याने पचनासाठी देखील फायदेशीर ठरतं.
कोथिंबीर- अॅसिडीटीसापासून आराम मिळण्यासाठी कोथिंबीरीची पानं तसंच बियांचा देखील वापर केला जातो. कोंथिबिरीच्या पानांचा रस पाणी किंवा ताकासोबत सेवन केला जातो. कोथिंबिरीच्या सुकलेल्या बियांच्या पावडरचा जेवणात वापर केला जातो. त्यातप्रमाणे या बियांचा चहाही बनवला जातो. अॅसिडीटीमुळे होणारा ब्लोटींगचा त्रास कमी करण्यासाठी कोथिंबीरीचा वापर केला जातो.