पित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. 

Updated: May 22, 2018, 04:24 PM IST
पित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय  title=

मुंबई : तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो. यामधूनच पित्ताचा त्रास बळावतो. पित्ताचा त्रास वारंवार होत असल्यास शरीरात त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. परिणामी आजकाल पित्ताशयांमध्ये खडे होण्याचा त्रास अधिक वाढला आहे.  

अनेकजण मूतखड्याप्रमाणेच हा त्रास असेल असे समजून काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हा त्रास जसजसा वाढतो तसे रूग्णांमध्ये पोटात तीव्र वेदना जाणवणं, उलट्यांचा त्रास बळावतो. मग या त्रासाला आटोक्यात ठेवण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय करावेत याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.  

कोणते घरगुती उपाय कराल ? 

 सफरचंद - यामधील मॅलिक अ‍ॅसिड पित्ताशयातील खड्यांची वाढ कमी करण्यास तसेच ते मऊ करण्यास मदत करतात. यामुळे ते सहज बाहेर पडण्यास मदत होते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कोलेस्ट्रेरोलच्या निर्मीतीचे प्रमाण कमी करतात. कोलेस्ट्रेरॉलदेखील पित्ताशयाच्या खड्यांची निर्मिती होण्याचे एक प्रमुख कारण आहे. ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

हळद - आयुर्वेदानुसार हळदीमुळे यकृताचे कार्य तसेच पित्ताचा प्रवाहदेखील सुधारते. नियमित हळदीचा आहारात समावेश केल्यास पित्ताशयाच्या खड्याची निर्मिती कमी होण्यास मदत होते. हळदीमुळे ते विरघळण्यास मदत होते. अर्धा चमचा हळद मधासोबत नियमित घेतल्यास पित्ताशयाचे खडे होत नाहीत.

ग्रीन टी - कॉफीमुळे पित्ताशयाचे खडे होण्याचे प्रमाण कमी होते. त्यातील कॅफीन घटक पित्ताशयाच्या बाहेरील बाजूचे आकुंचन करते. यामुळे खड्यांची निर्मिती कमी होते. पण कॉफी हे उत्तेजक पेय असल्याने ते पिण्याची तलफ सतत होऊ शकते. म्हणूनच कॉफ़ी ऐवजी ग्रीन टी पिणे अधिक फायद्याचे आहे. यामध्ये कॅफिनचे प्रमाण तुलनेत कमी असते.

एरंडेल तेल - पित्ताशयाच्या खड्यांचे दुखणे अतिशय वेदनादायी असते. यावर एरंडेल तेल हा फायदेशीर घरगुती उपाय आहे. एका कापडावर एरंडेल तेलाचे काही थेंब घालून दुखणार्‍या भागावर ठेवावे. त्याखाली प्लॅस्टिक रॅप घालून गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. हा प्रयोग तासभर सलग तीन दिवस केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

गोखरू - पित्ताशयातील तसेच मूत्रमार्गातील समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये गोखरूचा वापर केला जातो. गोखरूच्या पावडरने यकृत डीटॉक्सिफाय करण्यास मदत होते. मात्र हा उपाय करताना योग्य आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.  

पित्ताशयातील खड्यांवर घरगुती उपाय सुरूवातीच्या टप्प्यावर फायदेशीर ठरू शकतात. त्रास अधिक गंभीर होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.