मुंबई : प्रेमात पडल्यावर मुलानेच पुढाकार घेऊन प्रपोज करावं असा काहीसा अलिखित नियम आहे. पण मुलीने पुढाकर घेऊन प्रपोज करण्यातही काही गैर नाही. अगदीच पुढाकार घेऊन मुलींना थेट प्रपोज करणं जमत नसलं तरीही त्या नक्कीच काही हिंट देतात. मग मुलींच्या या बॉडी लॅग्वेजवरून त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे का? याचा अंदाज तुम्ही नक्की बांधू शकता.
मुली कणखर असतात. पण त्या जेव्हा एखाद्या मुलामध्ये गुंतत जातात तेव्हा त्या हक्काने त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करतात. मुली त्यांच्या आयुष्यातील अगदी लहानसहान समस्याही तुमच्यासोबत शेअर करत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी खास व्यक्तींपैकी एक आहे.
डोळे कधीच खोटं बोलू शकत नाहीत असं म्हणतात. तुमच्या मनातील प्रत्येक भावना ही डोळ्यांच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे व्यक्त होते. जर 'ती' तुम्हांला पसंत करत असेल तर सहाजिकच 'ती' तुमच्यासोबत आय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल.
कठीण काळातच आपलं कोण आणि परकं कोण? या गोष्टीचा खुलासा होतो. त्यामुळे तुमच्या लहान लहान समस्या, तुमच्या घरातील एखादा कठीण प्रसंग निभावून नेताना जर 'ती' तुमच्या पाठीशी उभी राहत असेल तर ती नक्कीच तुमच्या मैत्रिणीपेक्षा खास व्यक्ती आहे.
तुम्हांला जर 'ती' लहान लहान गोष्टींसाठीही प्रोत्साहन देत असेल, तुम्हांला योग्य ठिकाणी कॉम्प्लिमेंट देत असेल तर ती तुमच्यासाठी खास व्यक्ती आहे. 'ती'ला तुमच्याबद्दल खास भावना आहेत हे समजून घ्या.
तुम्ही काय करताय? कुठे आहात? अशा प्रत्येक लहानसहान गोष्टींवर जर 'ती' लक्ष ठेवून असेल, फोन करून तुमची वेळोवेळी चौकशी करत असेल तर 'ती' नक्कीच तुमच्या काळजीपोटी हे करत आहे. तुमच्याबद्दल तिला खास आकर्षण आहे. हे समजून घ्या.
अनेकदा प्रेम आणि आकर्षण यामध्ये गल्लत होते. म्हणूनच एखादं रिलेशनशिप फुलण्यासाठी त्याला पुरेसा वेळ द्या. समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाचा आदर ठेवून त्याच्या भावना समजून घ्या आणि शक्य असेल तेव्हा वेळेवर त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहचवा.