नवजात बालकाची नाळ जपून का ठेवावी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

New Born Baby Health Tips : बाळाचा जन्म म्हणजे एखाद्या सणवारापेक्षा काही कमी नाही. बाळ जन्माला येण्यापूर्वीचं आनंदसोहळाचा सुरु होतो. पण तुम्हाला माहित आहे का, जेव्हा बाळ गर्भाशयात असते तेव्हा 9 महिने त्याच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या नाळचं महत्त्व काय आहे? 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 16, 2024, 01:22 PM IST
नवजात बालकाची नाळ जपून का ठेवावी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… title=

Newborn Baby Umbilical Cord : गर्भवती महिलेला नववा महिना सुरु झाला की कुटूंबातील सदस्यांना बाळाच्या आगमनची उत्सुकता लागून राहते. आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. एखादी स्त्री गरोदर असेल तर तो क्षण फक्त तिच्यासाठीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा असतो. आईच्या गर्भात बाळ नऊ महिने वाढते. पण तुम्हाला माहितीयं गर्भाशयातील 9 महिने बाळाच्या जीवाचे रक्षण करणारी नाळ ही जपून ठेवायला का सांगतात? चला तर मग जाणून घेऊन बाळाची नाळ का जपून ठेवावीत?

गर्भातील अर्भकाला अम्बिलिकल कॉर्ड (umbilical cord) अर्थात जन्मनाळे मधूनच पोषण मिळते. जन्माच्या नंतर पोषण मिळवण्यासाठी बाळाच्या शरीराला अम्बिलिकल कॉर्डची काहीच गरज नसते आणि त्यामुळे डॉक्टर ती कापून टाकतात. मात्र त्यानंतर काहीजण बाळाची नाळ नामकरणच्या दिवशी मिक्स कडधान्यांचे रोपटे लावून त्यामध्ये बाळाची नाळ रोवतात. कारण परंपरेनुसार त्यांचा असा समज आहे की, जसं वृक्षाची वाढ होते तशी बाळाची वाढ होते. पण आता विज्ञान खूप पुढे गेले आहे. त्यामुळे काहीजण बाळाची नाळ जपून ठेवतात आणि त्याचे आरोग्यदायी फायदे मिळवतात. 

पूर्वीच्या नवजात बालकांची नाळ जपून ठेवली जायची. बाळ थोडंसं मोठं होईपर्यंत त्याच्या आजारात ही नाळ कामाला यायची. मात्र, अलीकडच्या काळात स्टेम सेल नावाची अत्याधुनिक प्रक्रिया वैद्यकीय शास्त्रात प्रगत झाली असली तरी आजही केवळ श्रीमंत वर्गासाठीच उपलब्ध होत आहे. या प्रक्रियेचे दर अर्ध्या लाखाच्या जवळपास असल्यामुळे इच्छा असूनही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आपल्या मुलाची नाळ कायमस्वरूपी जपू शकत नाहीत...

130 आजारांवर बालकाची नाळ फायदेशीर

स्टेम सेल प्रक्रिया गेल्या पंधरा ते वीस वर्षांत विकसित झाली आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नाळेतील रक्तात जे पेशी सापडले जातात, त्याला स्टेम सेल व कॉड ब्लड सेल असं म्हटले जाते. या पेशींमध्ये नवीन रक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. तर या पेशी कोणत्याही प्रकारच्या पेशी तयार करु शकतात. या पेशींपासून रक्ताचा कर्करोग, स्वादुपिंड व फुप्फुसाच्या रोगांवर, तसेच पॅरालायसिस, मतिमंदपणा, ब्रेन ट्युमर, रक्तवाहिन्यांना होणारा रोग थॅलेसिमिया, स्नायूला होणारा रोग सेरेब्रल पाल्सी अशा एकूण 130 आजारांवर या पेशींनी आत्तापर्यंत मात केली आहे. त्याप्रमाणेच एड्स, हदयविकार, रक्तासंबंधीचे रोगांवर स्टेम सेल पेशींचा प्रयोग केला जात असल्याची माहिती अपेक्षा मातृत्व आणि सर्जिकल नर्सिंग होमच्या मुख्य अपेक्षा रुग्णालयातील डॉ. मधुरा घाडीगावर यांनी दिली.

नाळ जपून ठेवण्यासाठी खासगी बँका

बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ जपून ठेवण्यासाठी खासगी बँकाही आल्या आहे. या बँकात जवळपास 40 ते 70 हजार रुपये लागत असल्याने याचा काहीजण तंत्रज्ञानाचा फायदा घेतात. भारतात केवळ दोन टक्केच लोकांना स्टेम सेल जपून ठेवण्याविषयी माहिती असल्यामुळे बाकी लोक या तंत्रज्ञानापासून अज्ञात आहेत. या बँका बाळाची नाळ 25 वर्षांपर्यंतच जपून ठेवतात. या स्टेम सेलचा उपयोग बाळाचे आई, वडील, भाऊ, बहीण व आजी, आजोबा तसेच नातेवाईकांनाही होऊ शकतो.

फ्रान्समध्ये पहिला प्रयोग

1988 मध्ये फ्रान्समधील पॅरिसमधील सहा वर्षांच्या मुलावर रक्त आणि प्रथिन पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पहिली कॉर्ड ब्लड सेलचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यानंतर या पेशींच्या बँकाही स्थापन करण्यात आल्या. तर भारतामध्येही स्टेम सेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये खाजगी बँकांचा मोठा समावेश भारतात दिसून येतो. भारतामध्ये सध्या हे तंत्रज्ञान संशोधनाच्या पातळीवर असल्याने त्याबाबत जनजागृती झालेली नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x