close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ही रक्ताची १० हजार रुपयांची चाचणी आता, होऊ शकते ५० रुपयांत

जाणून घ्या काय आहे हेमोफीलिया?

Updated: May 17, 2019, 03:15 PM IST
ही रक्ताची १० हजार रुपयांची चाचणी आता, होऊ शकते ५० रुपयांत

नवी दिल्ली : हेमोफीलिया (Haemophilia) आजाराच्या चाचण्या आतिशय महाग असतात. रक्तासंबंधी आजार असलेल्या या हेमोफीलियाच्या रक्त चाचण्यांची किंमत साधारण ४ ते १० हजार रुपयांपर्यंत असते. परंतु आता या महागड्या रक्त चाचणीपासून सुटका होणार असून ही टेस्ट केवळ ५० रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे. हेमोफीलियाच्या रक्त तपासणीसाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) पहिल्यांदाच रॅपिड डायग्नोस्टिक किट तयार केले आहे. या किटद्वारे हेमोफीलिया आणि इतर रक्तासंबंधित रोग शोधण्यासाठी भारतात जगातील सर्वात स्वस्त टेस्ट होऊ शकते. ICMRने या किटचे पेटंटही मिळवले आहे.

या किटला एका खास पेपरपासून बनवण्यात आलं आहे. याचा वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा किंवा विषेतज्ञांची गरज नाही. रुग्ण कोणत्याही हेल्थ केयर सेंटरमध्ये हेमोफीलियाची रक्त तपासणी करु शकतो. या किटमध्ये रक्ताचे काही थेंब पेपरवर टाकल्याने काही वेळातच याचा रिझल्ट मिळतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या आकड्यांनुसार, देशभरात हेमोफीलियाच्या रुग्णांची संख्या १ लाखांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

काय आहे हेमोफीलिया?

हेमोफीलियाग्रस्त रुग्णांचे रक्त अनेक प्रयत्न करुनही थांबत नाही. सामान्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागात काही लागल्यास किंवा कापल्यास काही वेळ रक्त वाहतं आणि नंतर थांबतं. परंतु हेमोफीलियाग्रस्त रुग्णांचे रक्त काही केल्या थांबत नाही. त्यामुळे या आजाराबाबत वेळेत समजणं गरजेचं आहे. अनेकदा या आजाराबाबत अनेकांना माहिती नसल्याने त्यांना हा आजार बळावला जातो. 

हेमोफीलियाची लक्षणे - 

नाकातून सतत रक्त वाहणे
हिरड्यांतून रक्त येणे
त्वचा सहजपणे निघणे
शरीरातील अंतर्गत रक्तस्रावामुळे सांधेदुखी होणे
हेमोफीलियामध्ये डोक्यातही रक्तस्राव झाल्याने डोकेदुखी आणि मान जखडून राहते
शरीरावर निळ्या रंगाचे डाग उठणे, डोळ्यांतून रक्त येणे, उल्टी येणे ही हेमोफीलियाची लक्षणे आहेत.