दिल्ली : ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असताना एक चांगली बातमी समोर येणार आहे. भारत बायोटेकच्या नेझल लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येण्याऱ्या लसीला बूस्टर डोस म्हणून मंजूरी देण्याचा विचार सुरु होता.
दरम्यान बैठकीत नेमका काय निर्णय झाला तो जाहीर केलेला नाही. मात्र नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीला म्हणजेच नेझल वॅक्सिनला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
भारत बायोटेक कंपनीने यासाठी सरकारकडे मंजूरी मागितली आहे. भारत बायोटेक कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, दोन डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस दिल्यास त्यांच्या नेझल वॅक्सिन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत बायोटेकने सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटलंय की, नेझल लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाऊ शकते. ज्यांनी Covaxin किंवा Covishield चे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी ही लस प्रभावी ठरू शकते.
यासाठी कंपनीला पाच हजार लोकांवर क्लिनिकल चाचण्या करायच्या आहेत. दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये 6 महिन्यांचे अंतर असावं.
राज्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा वाढतोय. दरम्यान यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना विषयावर महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.