मुंबई : कोरोना व्हायरसचा ओमायक्रोन स्ट्रेन भारतात दाखल झाला आहे का? सध्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे एपिडेमियोलॉजीचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी दिंलय. डॉ. पांडा यांच्या म्हणण्याप्रमाणे, हे शक्य आहे की ओमायक्रोन स्ट्रेन भारतात आला असेल आणि फक्त तो आढळला नसेल.
दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या काही लोकं कोरोना पॉझिटिव्ह असल्यावरून ते म्हणाले, "ओमायक्रोन व्हेरिएंटचे पहिलं प्रकरण 9 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत नोंदवले गेलं. तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेतून अनेक लोकं भारतात आले आहेत."
एका टीव्ही चॅनलशी बोलताना ICMRचे डॉ. पांडा म्हणाले, "भारतातील ओमायक्रोनचं कोणतंही प्रकरण समोर आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. हा प्रकार अतिशय संसर्गजन्य आहे आणि तो भारतात सापडणं केवळ काळाची बाब आहे. त्यामुळे हा व्हेरिएंट भारतातून कधीही समोर येऊ शकतो."
डॉ. पांडा म्हणाले, "लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरीही लस आपलं पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही हे आपण विसरू नका. कोविड-19साठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि साबण-पाण्याने वारंवार हात धुणं यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी न घेतल्यास तुम्हाला कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग कधीही होऊ शकतो."
लस घेऊनही जर संसर्ग होणार असेल तर लसीचा फायदा आहे का या विषयावर बोलताना डॉ. पांडा म्हणाले, "लस कदाचित तुम्हाला पुन्हा संसर्ग होण्यापासून वाचवू शकत नाही. परंतु यामुळे गंभीर संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका देखील कमी होऊ शकतो. म्हणूनच, जर तुम्ही अद्याप लस घेतली नसेल, तर लवकरात लवकर लस घ्या."