Sanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीचा विधासभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "जी जनता कोरोनाकाळात कुटुंबप्रमुख माझं ऐकत होती ती माझ्याशी विश्वासघात करेल असं वाटत नाही," असं ठाकरेंनी म्हटलं आहे. दुसरीकडे अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निकालावर थेट प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेच प्रवक्ते संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या पराभवावर विचारमंथन सुरु असल्याचं सांगतानाच नेमका पराभवासाठी कोणता फॅक्टर कारणीभूत ठरला याबद्दल भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या राजकीय संघर्षामध्ये मागील एक ते दीड महिन्यापासून अनेक मुद्दे चर्चेत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना, मराठा आरक्षणाचा मुद्दा, महिला सुरक्षेचा मुद्दा, संविधान, लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है यासारख्या घोषणांपासून अगदी गद्दारीचा मुद्दाही चर्चेत आला. जरांगे फॅक्टरचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र असं काहीही झालं नाही आणि राज्यामद्ये 288 पैकी 230 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. तर महाविकास आघाडीला 50 चा आकडाही गाठता आला नाही. महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावलं लागलं आहे. तर 12 अपक्ष उमेदवार आमदार झालेत. या साऱ्या गोष्टींसाठी कोणता फॅक्टर कारणीभूत ठरला याबद्दल राऊतांनी प्रसारमाध्यांशी बोलताना भाष्य केलं.
"या निवडणुकीमध्ये मतविभागणी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात मतविभागणीसाठी त्यांनी अडथळे निर्माण केले. स्वत:पेक्षा मतविभागणीवर जास्त लक्ष दिलं आणि त्याचा फटका आम्हाला बसला. मनसे, वंचितचं मॅनेजमेंट करुन आमचे उमेदवार पाडण्यात आले. हे चित्र तुम्ही मुंबईसहीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघू शकता," असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी काय तीर मारला आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांचे लोक, स्वयंसेवक घराघरात जाऊन वेगळ्याप्रकारचा विषारी प्रचार करत राहिले. लोकांची मन आणि मतं भरकटवली. त्याचा काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसलं. आमची चाचपणी करत आहोत," असंही राऊतांनी सांगितलं.
नक्की वाचा >> विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी...'
"शरद पवारांनी उघडपणे गद्दारांविरोधात भूमिका घेतली. शरद पवारांना मानणारा वर्ग आहेत तिथे उमेदवार पडले असतील तर चिंतेची बाब आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आम्हाला हार पत्करावी लागली तो गंभीर विषय आहे. शिंदे मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही. त्यांनी बेईमानी करुन भाजपा, मोदी-शाहांच्या मदतीने आपलं राजकारण केलं. भाजपा वापरा आणि फेका वृत्तीचा असल्याने जे उद्धव ठाकरेंबद्दल घडलं ते शिंदेंबरोबर घडेल याबद्दल मला शंका आहे," असंही राऊत म्हणाले.
"राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना विशेष करुन मोदी-शाहांना मदतीची भूमिका घेतली नसती तर राज्यात एक आशादायक चित्र दिसलं असतं. अनेक ठिकाणी त्यांना भाजपाने त्यांना उमेदवार उभे करावे लागले. त्याचा अनेक वर्ष परिणाम होतोय आणि झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे तसेच सगळ्याचे मित्र आंबेडकरांच्या उमेदवारांनी भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेतली. या सगळ्याचा भविष्यात विचार करावा लागेल. महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीविरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल," असं राऊतांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> चंद्रचूडांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा राऊतांचा दावा! म्हणाले, 'पैशांचा...'
"मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात शपथ घेण्याऐवजी त्यांनी गुजरातमध्ये शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद आहे. गुजरातला मोदींच्या नावाने जे स्टेडियम आहे तिथं जास्त लोक बसतात. त्यांनी तिथे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा घेणं अधिक संयुक्त ठरेल. शिवाजी पार्कला घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडेवर घेतला तर समोरच्या 106 हुतात्माचा अपमान ठरेल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आलेलं आहे. लादण्यात आलेलं आहे," असं राऊत म्हणाले.
"बाळासाहेबांचा वारसा गुजरातचे तळवे चाटून विकत घेता येत नाही. बाळासाहेबांनाही पराभवाचे धक्के बसलेत. त्याची परवा न करता ते लढत राहिले. आम्ही अजूनही जमिनीवर उभे आहोत आणि लढत आहेत," असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.