close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही.  

Updated: Feb 21, 2019, 04:42 PM IST
खाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा
Image Source: Britannia website

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही. कारण खाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ की मैदा याबाबत स्पष्ट उल्लेख हवा जर तो नसेल तर कारवाई होणार आहे. त्यामुळे दुकानात मिळणारे रेडिमेड फुडच्या वेष्टनावर तसा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. याची मुदत 30 मार्चपर्यंत देण्यात आली आहे. हा बदल न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अन्नपदार्थ उत्पादकांना देण्यात आला आहे.

अन्नपदार्थांत मैदा आहे की गव्हाचे पीठ, याबाबत अनेकदा माहिती मिळत नाही. केवळ गव्हाच्या कणसाचे चित्र दाखविले जाते. मात्र, मैद्याचा वापर केल्याचे सांगण्यात येत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ की मैदा याची माहिती द्यावी लागणार आहे. यापूर्वीही अस्तित्वात असलेल्या या नियमाचे उत्पादक कंपन्या पालन करत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाकडे कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे नियमाची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. 

अनेकवेळा गव्हाचे पीठ असल्याचे सांगून पदार्थ हा मैद्याचा असतो. तसेच अन्नपदार्थांच्या पॅकिंगवर घटकांची माहिती इंग्रजीत दिलेली असते; मात्र गव्हाचे पीठ आणि मैदा यांच्या उल्लेखात संदिग्धता असते. गव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ असा उल्लेख अपेक्षित असताना कित्येकदा ‘रिफाईण्ड फ्लोअर’ असे लिहिले जाते. हा उल्लेख चुकीचा आहे. हाच मुद्दा व्यापाऱ्यांनी तक्रार करताना मांडला. ‘रिफाईण्ड फ्लोअर’ म्हणजे प्रत्यक्षात मैद्याचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. तसेच आरोग्याचा प्रश्नही उद्भवतो.

कायद्यानुसार गव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ आणि मैद्यासाठी ‘रिफाईण्ड फ्लोअर’ असे लिहिणे बंधनकारक आहे. परंतु, अन्नपदार्थ उत्पादक कंपन्या योग्य माहिती देत नाहीत. केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न येतो. अनेकवेळा जाहिराती दाखवताना तसाच प्रयत्न होतो. ग्राहक तयार फुड घेताना विश्वास ठेवतात. मात्र, बरेचवेळा फसवणूक झालेली असते. व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीमुळे या तथ्य असल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार दुकानांतून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांतील घटक स्पष्ट करण्याचा आदेश अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने दिला आहे. गव्हाचे पीठ आणि मैदा याबाबत कंपन्यांनी स्पष्टता ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

गव्हाचे पीठ आणि मैदा याबाबत कंपन्यांनी अन्नपदार्थांच्या वेष्टनावर तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा. हे बदल करण्यासाठी ३० मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी केले आहे.