मुंबई : पनीर आणि टोफूमध्ये अनेक लोकांना फरक कळत नाही. आहार हेल्दी व्हावा यासाठी बरेच जण टोफूचा वापर करतात. हे दोन्ही अन्नपदार्थ पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि हे सुपर फूडपेक्षा कमी नाहीत यात शंका नाही. पण जेव्हा या दोघांमध्ये निवड करण्याचा विचार येतो तेव्हा तुम्ही काय निवडता?
100 ग्रॅम पनीरमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आणि फॅट असतं. त्यात 3.57 ग्रॅम कार्बोहाइड्रेट्स असतात, परंतु फायबरची कमतरता असते. त्याचप्रमाणे, 100 ग्रॅम टोफूमध्ये फक्त 8.72 ग्रॅम फॅट, 17.3 ग्रॅम प्रोटीन आणि 2.78 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. पण पनीरच्या उलट, 100 ग्रॅम टोफूमध्ये 2.3 ग्रॅम फायबर असतं.
याशिवाय टोफूमध्ये कॅल्शियमचं प्रमाण पनीरपेक्षा जास्त असते. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पनीरमध्ये लोहाचं प्रमाण अजिबात नसते, तर टोफूमध्ये हे प्रमाणं चांगलं असतं.
जेव्हा आपण आरोग्याचा विचार करून निवड करतो तेव्हा त्यात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कॅलरीज. कॅलरीजचं सेवन हे अन्नातील उर्जेचं प्रमाण दर्शवते. असं मानलं जातं की, अधिक कॅलरी अधिक ऊर्जा देते. यासोबतच पोटही चांगलं भरतं. पनीर आणि टोफूच्या कॅलरीजमध्ये मोठा फरक आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये 321 कॅलरीज असतात, तर टोफूमध्ये फक्त 144 कॅलरीज असतात. यावरून हे स्पष्ट होते की पनीरमध्ये जास्त कॅलरीज असतात.
टोफूमध्ये भरपूर सोया प्रोटीन असतं, जे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतं. हेच कारण आहे की ज्यांचं किडनी प्रत्यारोपण झालं आहे किंवा डायलिसिसवर आहेत अशा लोकांना टोफू खाण्याची शिफारस तज्ज्ञ करतात.