ब्रिटनमध्ये कोरोनाच्या महामारीत नागरिकांमध्ये जाणवतेय अजून एक 'समस्या'

संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देतंय.

Updated: Jun 9, 2021, 05:32 PM IST
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या महामारीत नागरिकांमध्ये जाणवतेय अजून एक 'समस्या'  title=

मुंबई : संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देतंय. दरम्यान कोरोनाच्या या महामारीचे अनेक प्रभाव दिसून येतायत. असंच ब्रिटनमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनानुसार, एक तृतीयांश प्रौढ व्यक्तींमध्ये दिसण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय. 

कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रिस्ट (College of Optometrists) दोन हजार लोकांना काही प्रश्न विचारले. यामध्ये व्यक्तींना विचारलं की, जून 2020 मध्ये पहिल्या लॉकडाऊनच्या नंतर दृष्टी कशी होती आणि एप्रिल 2021 चा लॉकडाऊन संपल्यानंतर दृष्टीमध्ये काही फरक पडला का. 

या 2 हजार लोकांपैकी 31 टक्के लोकांनी 2021 च्या लॉकडाऊननंतर त्यांच्या दृष्टीत नकारात्मक परिणाम झाल्याचं सांगितलं. सर्व्हेक्षणात सहभागी असलेल्या  44 टक्के लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, स्क्रिन टाईम वाढल्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये फरक पडला आहे. यामधील अनेकांनी दृष्टीवर परिणाम होत असल्याचं लक्षात आल्यावर तातडीने डॉक्टरांची मदत घेतली. तर काहींना कोरोनाच्या भितीमुळे डॉक्टरांकडे जाणं टाळलं.

लॉकडाऊनमुळे घरी असल्याने स्क्रिन टाईम वाढवल्यामुळे डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना जे.जे रूग्णालयाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सायली लहाने म्हणाल्या, "लॉकडाऊनच्या काळात स्क्रिनवरील वेळ वाढल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. यामध्ये डोळे कोरडे पडणं, नंबर वाढणं, डोळे दुखणं या तक्रारींना सामोरं जावं लागतं."

डॉ. सायली पुढे म्हणाल्या, "केवळ मोठ्या व्यक्ती नाही तर लहान मुलांमध्येही डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मुलांना केवळ शिक्षणापुरताचं मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करण्यास द्यावा. तसंच प्रौढांनीही कामाव्यतिरीक्त असलेला स्क्रिन टाईम कमी करावा. तसंच अंधारात मोबाईलचा वापर करू नये."

दरम्यान जर लोकांना डोळ्यांसंदर्भात कोणतीही समस्या जाणवत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांची मदत घ्यावी. अशा तक्रारींवर वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.