... तर पपई खाणं आरोग्याला धोकादायक

ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. 

Updated: Jul 26, 2018, 03:31 PM IST
... तर पपई खाणं आरोग्याला धोकादायक  title=

मुंबई : ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. पपई या फळाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. पपई आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आहारात समावेश करणं अधिक फायदेशीर आहे. 

पपईमध्ये आरोग्यदायी घटक 

पपईमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, प्रोटीन, कॅरोटीन आणि नैसर्गिक स्वरूपातील फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारायला मदत होते. जसे पपईचे फायदे आहेत तसेच पपईच्या सेवनाचे आरोग्याला काही तोटे आहेत. यामुळे पपई कोणी खाऊ नये? हेदेखील तुम्हांला ठाऊक असणं आवश्यक आहे. 

गरोदर स्त्रीया - 

कच्ची पपई गरोदर महिलांसाठी अधिक धोकादायक आहे. पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते. परिणामी गर्भपात होण्याची शक्यता वाढते. 

रक्तदाब - 

रक्तदाबाची समस्या असणार्‍यांमध्ये पपईचं अतिसेवन धोकादायक ठरू शकते. रक्तदाबाची औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. 

किडनी स्टोन 

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅन्टि ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनेक आजारांचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज  होते. एका अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन सीचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी स्टोन बळावण्याची शक्यतादेखील वाढते.  

त्वचेवर दुष्परिणाम 

त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. पपईमधील बीटा कॅरोटीन अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरते. म्हणूनच पपईच्या अतिसेवनामुळे त्वचेचे नुकसान होते. 

स्तनपान करणार्‍या महिला 

लहान मुलांना स्तनपान करणार्‍या महिलांना पपईचं सेवन नुकसानकारक आहे. बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्यालाही पपईचं सेवन करायला न देणंचं अधिक फायदेशीर आहे. 

बद्धकोष्ठता 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍यांमध्ये पपईचं सेवन आरोग्याला त्रासदायक आहे. सोबतच हृद्यविकाराचा त्रास असणार्‍यांमध्ये नियमित रक्त पातळ होण्यासाठी काही औषधं सुरू असल्यास त्यांनी पपईचे सेवन टाळावे.