पायांना सारखी सूज येतेय...ही 5 कारणं असू शकतात

पायाला सूज आली की पाय दुखण्याचीही तक्रार येते. 

Updated: Jun 22, 2021, 07:21 AM IST
पायांना सारखी सूज येतेय...ही 5 कारणं असू शकतात title=

मुंबई : पायांमध्ये सूज आल्याने व्यक्तीला चालण्यास किंवा उभं राहण्यास देखील त्रास होतो. त्याचप्रमाणे पायाला सूज आली की पाय दुखण्याचीही तक्रार येते. ज्यामुळे ही समस्या अजूनच गंभीर बनत जाते. जर तुमच्या पायाला सूज येत असेल तर आपल्या शरीरात काहीतरी असामान्य असण्याची शक्यता आहे. कदाचित हे हृदयाशी देखील संबंधीत असू शकतं.

आरोग्यतज्ज्ञ डॉ. अबरार मुल्तानी यांच्या सांगण्याप्रमाणे, पायांना सूज येण्याच्या मागे खाली दिलेली कारणं असू शकतात

बीपीची औषधं आणि स्टेरॉईड्स

जर तुम्ही ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बीपीची औषधं घेत असाल तर त्या औषधांचा दुष्परिणाम पायांवर होऊ शकतो. यामध्ये पायांना सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे सोरायसिस आणि अस्थमा यांसारख्या समस्यांसाठी स्टेरॉईड्स घेतल्याने सुद्धा पायांना सूज येऊ शकते. असं होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

हृदयाची कमजोरी

डॉ. अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्हाला पायाला सूज येण्यासोबत श्वास लागणं, झोपेची समस्या आणि पोटफुगीची समस्या जाणवत असेल तर यामागे हृदयाची काही तक्रार असण्याची शक्यता आहे. पायामधील रक्तप्रवास सुरळीत ठेवण्याचं कामंही हृदयाचं आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं असल्यास पायाला रक्तप्रवाह देखील सुरळीत राहील. हृदयाचं आरोग्य योग्य नसल्यास पायामध्ये रक्ताची अडवणूक होते आणि पाय सूजू शकतो.

किडनीसंबंधी समस्या

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पायांना सूज येण्यासोबत जर चेहऱ्याला गदेखील सूज येत असेल आणि लघवीची समस्या उद्भवत असेल तर यामागे किडनीची तक्रार असण्याची शक्यता आहे.

एनिमिया

एनिमियाग्रस्त असलेल्या रूग्णाच्या शरीरात रक्ताची कमी असते. हा त्रास महिलांमध्ये अधिक पहायला मिळतो. पायाला सूज आल्यासोबत श्वास लागणं, हात-डोळे-जीभेचा रंग फिका पडणं ही लक्षणं दिसत असतील तर हे रक्ताच्या कमतरतेमुळे होत आहे.

हायपो थायरॉइडिजम

महिलांना जर पायांना सूज येण्यासोबत ताप, वजन वाढणं आणि मासिक पाळीमध्ये अनियमितता असेल तर ही हायपो थायरॉइडिजमची समस्या असू शकते. अशी लक्षणं जाणवत असल्यास थायरॉईडची चाचणी करून घ्यावी.