मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींचं मिक्सिंग आणि मॅचिंगचे चांगले रिझल्ट आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आले होते. मात्र अजूनही भारत सरकारने याला परवानगी दिलेली नाही. सध्या यावर अजून अभ्यास सुरु आहे. दरम्यान हरियाणाच्या गुरुग्रामधील एक तरूणाला वेगवेगळ्या कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय. लसीचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतरही वेगळी लस दिल्याचा आरोप या तरूणाने केला आहे.
हरतीरथ सिंह याने 8 जून रोजी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर तो दुसऱ्या डोससाठी केंद्रावर पोहोचला असता त्याला कोव्हिशील्ड या लसीचा दुसरा डोस लावण्यात आला.
दुसरा डोस घेतल्यानंतर हरतीरथ सिंहने तातडीने यासंदर्भात ट्विट केलं आहे. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "कोरोना लसीचं प्रमाणपत्र दाखवूनही पहिला डोस-कोवॅक्सिन आणि दुसरा डोस-कोव्हिशील्ड. कृपया काय करावं ते लवकर सांगावं. रोझवुड सिटी, सेक्टर 49, गुडगाव इथल्या लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला."
First Dose- Covaxin, Second Dose Covisheild despite showing the certificate to them. Pls advise urgently on what to do
Happened at Rosewood City, Sector 49 Gurgaon vaccination centre @DC_Gurugram @cdgurugram
— Harteerath Singh (@HarteerathSingh) August 25, 2021
दरम्यान दुसरा डोस घेतल्याचा मेसेज हरतीरथला 15 दिवसांपूर्वीच आला होता. मात्र तेव्हा त्याने दुसरा डोस घेतला नव्हता.
हरतीरथच्या म्हणण्याप्रमाणे, लसीकरण केंद्राच्या डॉक्टरांनीही ती चूक स्वीकारली आहे. मी माझ्या फोनवरून माझ्या लसीचं प्रमाणपत्र दाखवलं होतं. जेव्हा मला लस मिळाली तेव्हा नर्सने माझे अभिनंदन केले आणि सांगितले की दुसरा डोस कोविशील्डचा झाला. त्यावेळी मला समजलं की दुसरा डोस वेगळा देण्यात आला आहे.
कोव्हिशीलड्ची दुसरी लस घेतल्यानंतर हरतीरथ त्याला काही काळ डॉक्टरांच्या आब्जर्वेशनखाली ठेवण्यात आलं. जवळपास 2 तास त्याला केंद्रावर बसवण्यात आलं.