मुंबई : फीट आणि निरोगी राहण्यासाठी तुमच्या शरीरातील कोलस्ट्रॉल नियंत्रणात असणं गरजेचं आहे. शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. तर आता प्रश्न असा आहे की, तुम्ही कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात ठेवावं. यासाठी तुम्हाला कोलेस्ट्रॉल का वाढतं याची कारणं सांगणार आहोत.
फायबर हे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला कमी प्रमाणात फायबर मिळालं तर कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबरचा पुरेसा समावेश केला पाहिजे.
सध्या धावपळीच्या जीवनात आपण पॅकेटमध्ये बंद असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातो. यामध्ये सकाळच्या नाश्त्याला देखील आपण असंच जंक फूज खातो. मात्र या पद्धतीच्या खाण्याने तुमच्या शरीराचं नुकसान होतंय. या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलही वाढू शकतं. पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजनातही वाढ होते.
दारू पिणं हे अनेक गंभीर आजारांचं कारण मानलं जातं. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. जर तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल तर तुम्ही अल्कोहोलपासून दूर राहणं फायदेशीर आहे. अल्कोहोल पिणं हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी आवश्यक आहेत. ते शरीराला पुरेसं कॅल्शियम आणि प्रोटीन मिळवून देण्यास मदत करतात. मात्र उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचं सेवन टाळलं पाहिजे.
तेलकट पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. शरीरात कोलेस्ट्रॉलची वाढ होण्यामागे तळलेले पदार्थ कारणीभूत असतात. त्यामुळेच शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल नियंत्रणात राखण्यासाठी तळलेले पदार्थ खाऊ नयेत.