मुंबई : लिंबाचे अनेक फायदे आहेत. आरोग्याच्या, सौंदर्याच्या अनेक समस्यांवर लिंबू फायदेशीर ठरतो. पण लिंबाचा वापर केल्यानंतर लिंबाची साल आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का? लिंबाच्या सालीने तुम्ही तुमचे घर चमकवू शकता. कारण लिंबाच्या सालीत नैसर्गिक ब्लीच असते त्यामुळे वस्तू चमकवण्यासाठी त्याचा वापर होतो. पाहुया कसा करायचा लिंबाच्या सालीचा वापर...
१. स्वंयपाकघरातील सिंक वापरामुळे घराब होतो, काळा पडतो. लिंबाच्या मदतीने तुम्ही काही वेळात सिंक चमकवू शकता. यासाठी लिंबू आणि मीठाची घट्टसर पेस्ट बनवा. या पेस्टने सिंक साफ करा.
२. कचऱ्याच्या डब्याला येणारा वास दूर करण्यासाठीही लिंबू कामी येऊ शकतो. यासाठी कचऱ्याच्या डब्यात लिंबाचा रस घाला. काही वेळ तसंच ठेवून द्या. काही वेळाने डबा पाण्याने साफ करा. डब्याला येणारी दुर्गंधी दूर होईल.
३. मायक्रोव्हेवमध्ये जमलेली घाण दूर करण्यासाठी महागड्या क्लिनरऐवजी लिंबाचा वापर करु शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या. यात लिंबाच्या सालीही घाला. त्यानंतर ५ मिनिटे हे मिश्रण मायक्रोव्हेवमध्ये गरम करा. त्यानंतर ते बाहेर काढून मायक्रोव्हेव कपड्याने आतून पुसून घ्या.
४. कपड्यांवरील डाग काढण्यासाठीही लिंबाचा वापर करु शकता. कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी लिंबाचा तुकडा डागावर घासा आणि त्यानंतर कपडा धुवून उन्हात सुकवा. डाग गायब होतील.
५. घरातील दरवाजे, खिडक्यांच्या काचा तसंच कारच्या काचा साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करु शकता.
६. झाडांना किंवा कुंडीत लावलेल्या रोपांना खत म्हणून लिंबाच्या सालीचा वापर करु शकता. यासाठी लिंबाची साल पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटा आणि ते पाणी झाडांना घाला. हे झाडांसाठी पौष्टीक खाद्य ठरेल.