मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही-लाही होते, अशा वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. आपल्याकडे हंगामी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात कलिंगडचा आहारात समावेश करा. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...
- कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही. त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात.
- कलिंगड खाणाऱ्यांना हृदयासंबंधित आजार होत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. कारण कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
- उन्हाळ्यात ऊन्हामुळे त्वचेच्या समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
- कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ काही खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.
- कलिंगडात अनेक व्हिटॅमिन्स असतात. जे आरोग्यासाठी महत्वाचे असतात. यातील व्हिटॅमिन 'ए' शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.