White Hair Problem: म्हातारपण लवकर येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यातही तरुण असताना आपलं वय जास्त दिसत असेल तर अनेकांना चिंता सतावत असते. यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. त्यातीलच एक बाब म्हणजे आपले केस हे नेहमीच काळेकुट्ट दिसावेत यासाठी फक्त तरुणीच नाही तर तरुणांचाही प्रयत्न असतो. जरा केस पांढरे झाले (White Hair Problem) की आता आपलं वय जास्त दिसेल अशी चिंता सतावू लागते.पण केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. ही कारणं काय आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर केसांचा रंग हळूबळू बदलत जातो आणि पांढरे केस डोकं वर काढू लागतात. पण वयाच्या 25 ते 30 व्या वर्षाच जेव्हा केस पांढरे होऊ लागतात तेव्हा मात्र चिंता सतावू लागते. सध्याच्या काळात तर सर्रासपणे अनेक तरुण या समस्येचा सामना करत असतात. जास्त विचार करणाऱ्यांचे केस लवकर पांढरे होतात असं सर्रासपणे सांगितलं जातं. पण खरंच हे एकमेव कारण आहे का?
केसांच्या रंगाचा संबंध आपल्या शरिरातील मेलॅनिन (Melanin) नावाच्या नैसर्गिक रंगद्रव्याशी असते. या रंगद्रव्यामुळे केसांना रंग येतो. मेलेनोसाइट्सच्या (Melanocytes) माध्यमातून मेलॅनिन तयार होतं. त्वचेच्या पृष्ठभागावरील (फॉलिक्स) या विशेष रंगद्रव्य पेशी आहेत. यांच्या माध्यमातूनच केसांची वाढ होते.
आपल्या केसांच्या फोलिकल्समध्ये (Follicles) मेलॅनिनच्या दोन प्रकारांपैकी एक प्रकार असू शकतो. काळ्या आणि तपकिरी रंगाचं रंगद्रव्य ज्याला युमेलानिन (eumelanin) म्हटलं जातं. हे रंगद्रव्य प्रामुख्याने काळ्या आणि तपकिरी केसांमध्ये असतं. पिवळ्या किंवा लाल रंगद्रव्याला फोमेलानिन (Pheomelanin) म्हटलं जोतं, जे सोनेरी केसांमध्ये असते.
तरुणपणात केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. अनेकदा हे अनुवांशिकही असतं. तसंच व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, अशक्तपणा, प्रथिनांची कमतरता, लोह आणि तांब्याची कमतरता, हायपोथायरॉईडीझम या गोष्टीदेखील केस पांढरे होण्यासाठी जबाबदार असतात.
अनेकदा केसांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं तेल तसंच केमिकल लावत असतो. या गोष्टीही केसांसाठी हानिकारक असून केस सफेद होण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. याशिवाय बुक्स सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, वर्नर सिंड्रोम, तणाव, औषधांचा प्रभाव या गोष्टीही जबाबदार ठरतात.
जर तुम्हालाही केस पांढरे झाल्याने चिंता सतावत असेल तर वर दिलेल्या कारणांपैकी एखादी समस्या आहे का हे पडताळून पाहात. मात्र जर यातील कोणताही त्रास तुम्हाला नसेल आणि तरीही समस्या जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.