Mystery Disease WHO Experts: संपूर्ण जगाला 2020 ते 2022 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोरोनाने विळखा घातला होता. साधार 100 वर्षांमध्ये कधीतरी एकदाच येणाऱ्या अशा महासाथीचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसला. जगातचं आर्थिकचक्रचं या आजाराने थांबवलं. कोरोनाच्या आठवणी ताजा असतानाच आता आफ्रिकेमध्ये एका रहस्यमयी आजाराने थैमान घातलं आहे. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. याच रहस्यमयी संसर्गाचा सखोल तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी कांगो प्रजासत्ताक या देशामध्ये एक विशेष टीम नियुक्त करत असल्याची घोषणा केली आहे. आरोग्यविषय तज्ज्ञांची ही टीम असून त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिका खंडातील कांगो प्रजासत्ताक या छोट्याश्या देशातील दुर्गम भागात अनेक लोकांचा रहस्यमय आजाराने मृत्यू झाला आहे. हा आजार नेमका काय आहे, याची माहिती समोर आलेली नाही. या आजाराचं निदान आतापर्यंत झालेलं नाही त्यामुळेच त्यासंदर्भातील अभ्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ही टीम या छोट्याश्या देशात रवाना केली आहे.
कांगो प्रजासत्ताक या देशाच्या नैऋत्येला असलेल्या क्वांगो प्रांतामधील पान्झी येथे हे जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ भेट देणार आहे. या तज्ज्ञांबरोबर जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्यविषयक मदतही पाठवली आहे. या ठिकाणी ही टीम औषधांचं वाटप करण्याबरोबरच हा आजार नेमका काय आहे याचं निदान करण्यासाठी उपयोगी पडणारं साहित्यही पोहचवणार आहे. हा रहस्यमयी आजार नेमका कशामुळे पसरतोय याचा शोध घेण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या जातील असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. तसेच या दौऱ्यासंदर्भात जसजशी माहिती समोर येत जाईल, जे काही हाती लागेल त्याबद्दलचा खुलासा केला जाईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
"ज्या कुटुंबांना आणि स्थानिक गटांना याचा फटका बसला आहे त्यांना परिणामकारक माध्यमातून सहाय्य करण्याचा आमचा मूळ उद्देश आहे," असं आफ्रिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशक डॉक्टर मात्शिदिसो मोईती यांनी सांगितल्याचं वृत्त 'रॉयटर्स'ने दिलं आहे. "हा आजार नेमका कशामुळे पसरतोय याचा शोध घेतला जात आहे. तो कोणत्या माध्यमातून पसरतोय याचा तपासही केला जात आहे. त्यानुसार शक्य तितक्या लवकर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील," असा विश्वास मात्शिदिसो यांनी व्यक्त केला.
या रहस्यमय आजाराचा संसर्ग झालेले 394 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कांगो प्रजासत्ताकच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीमधून समोर आली आहे. याच आठवड्यामध्ये येथील स्थानिक प्रशासनाने अज्ञात आजारामुळे पान्झी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नोव्हेंबर महिन्यात 143 जणांनी प्राण गमावल्याचा खुलासा केला होता. सध्या जो रहस्यमय आजार पसरतोय त्याची लक्षणंही समोर आली आहेत. डोकेदुखी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे, अॅनिमिया असा त्रास या रहस्यमयी आजाराचा संसर्ग झाल्यानंतर होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.