मुंबई : वयाच्या 40शीनंतर उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या असते. जर तुम्ही ब्लड प्रेशरचा सामना करत असाल तर नियमित व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की, व्यायाम केल्यानंतर तुमचा रक्तदाब वाढू शकतो. याचे कारण असं की, जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे स्नायू आकुंचन पावतात जेणेकरून हृदयाला रक्त पंप करता येते.
तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, व्यायाम करताना सिस्टोलिक रक्तदाब वाढू लागतो. पण त्याचा फार काळ परिणाम होत नाही. काही काळानंतर तुमचा रक्तदाब कमी होऊ लागतो. याचा अर्थ असा की, काही काळ तुमचा रक्तदाब वाढतो पण लवकरच तो सामान्य होतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी व्यायाम करणं फायदेशीर आहे.
मुळात अवघे दोन तास व्यायाम केल्यानंतरही तुमचा रक्तदाब वाढतो. यासाठी रक्तदाबातील फरक जाणून घ्यायचा असेल तर व्यायाम करण्यापूर्वी रक्तदाब तपासा आणि व्यायाम केल्यानंतर दोन तासांनी पुन्हा रक्तदाब तपासा. व्यायामादरम्यान जर तुम्ही तुमचा रक्तदाब तपासलात, तर या काळात तो वाढेल.
हायपरटेन्शचा त्रास असलेल्या रूग्णांनी डॉक्टरांशी बोलणं आवश्यक आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या त्या व्यक्तींनी धावणं, सायकल चालवणं यांसारखे व्यायाम करावेत.
जर तुम्ही व्यायाम पूर्ण तीव्रतेने करू शकत नसाल तर त्यात छोटे बदल करून तो सोपा करावा. तीव्र व्यायाम केल्यानंतर तुम्हाला चक्कर येऊ लागली किंवा मळमळ होऊ लागली, तर त्याऐवजी तुम्ही इतर व्यायाम करू शकता.
जर तुम्हाला सर्वात सामान्य व्यायाम करायचा असेल तर तुम्ही चालणं, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग इत्यादींचा प्रयत्न करू शकता.