मुंबई : गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने थैमान घातलं असून आता या व्हायरसमध्ये म्युटेशन होत असल्याचं आढळतंय. दरम्यान कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रूग्ण महाराष्ट्रात देखील आढळून आले आहेत. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतोय की कोरोनाचा प्रत्येक व्हेरिएंट हा महाराष्ट्रात का दिसून येतोय.?
महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनचं केंद्र बनलं आहे का? का प्रत्येक व्हेरिएंट महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट देखील महाराष्ट्रात मिळाला असून तो दुसऱ्या लाटेचं कारण ठरला. दीर्घकालीन आजार आणि अधिक रूग्णसंख्या हे म्युटनेशनचं कारण बनत आहे. दरम्यान तज्ज्ञांनी परदेशी प्रवासी, सागरी व्यापार, हवामान, घनता यांसारख्या अनेक बाबींनाही याचं कारण मानलंय.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंट B.1.617.2 चं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. म्युटेशनच्या अभ्यासासाठी नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 733 नमुने गोळा केले गेले. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगची प्रक्रिया सुरू झाली, ज्यात असं आढळलं की व्हायरसचं 47 वेळा म्युटेशन झालं होतं.
दरम्यान डेल्टा प्लसचे देखील 2 व्हेरिएंट असल्याचं बोललं जातंय. यांना AY.1 आणि AY.2 असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि मुंबई कोविड टास्क फोर्स याची वेगवेगळी कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. टास्क फोर्सनुसार, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे जीनोम सिक्वेंसींगसाठी प्रत्येक 36 जिल्ह्यातून सुमारे 100 नमुने पाठवते, त्यामुळे म्यूटेशन ओळखणं सोपं होतंय.
राज्यातील टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणतात, "महाराष्ट्र हे औद्योगिक आणि प्रगतीशील राज्य आहे. त्याचप्रमाणे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. लोकं इतर ठिकाणाहून ये-जा करत असतात. या कारणामुळे स्ट्रेन म्युटेशन होऊ शकतो. आपल्यात संक्रमित होण्याची संख्या जास्त असल्याने विषाणूला म्यूटेशन करण्याची संधी मिळते. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी महाराष्ट्र दरमहा प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेत आहे, ज्यामुळे आम्ही डेल्टा प्लस असल्याचं समोर आलं."
बीएमसी कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी सागरी व्यापार, दमट हवामान यांसारख्या अनेक घटकांना म्युटेशनचं कारण मानलं आहे. ते म्हणाले, "पहिली आणि दुसरी लाटेला महाराष्ट्र आणि केरळपासून सुरू झाली. मला समजलेलं मुख्य कारण म्हणजे समुद्री मार्ग. महाराष्ट्र, केरळ, गुजरात ही किनारपट्टीची राज्यं आहेत. तिसरी लाट महाराष्ट्र आणि केरळमध्येही प्रथम येत असल्याचं दिसतंय. हवामान देखील एक घटक आहे. पहिला केरळ नंतर महाराष्ट्रात पाऊस पडला, त्याचप्रकारे संसर्गाचा कलही असा जाताना दिसतोय."
राज्य सरकारच्या अनेक प्रमुख आरोग्य प्रकल्पांशी संबंधित वैज्ञानिक डॉ. सुरेशचंद्र सिंह यांच्या सांगण्याप्रमाणे, "हवाई मार्ग, लोकसंख्या घनता, समुद्री मार्गाद्वारे बहुतेक वस्तूंचा पुरवठा केला जातो. याशिवाय मुंबईमार्गे मध्य-पूर्वेशी आपला संपर्क होतो. जर आपण प्रथम सापडलेल्या प्रकरण पाहिलं तर त्यामध्ये दुबईच कनेक्शन आहे."