मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1045 नवीन रुग्ण आढळून आले असून यादरम्यान एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 4,559 सक्रिय रुग्ण असून बाधितांची संख्या 78,89,212 वर पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंत 1,47,861 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंधाचा कालावधी सुरू होऊ शकतो. राज्यात पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला जाऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाची प्रकरणं वाढत राहिल्यास लोकांना मास्क वापरणं अनिवार्य करावं लागेल. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. कोरोना संसर्गाची संख्या अशीच वाढत राहिल्यास मास्कचा वापर अनिवार्य करावा लागू शकतो.
कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक घेतली.
टास्क फोर्सच्या सदस्यांच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांना पुन्हा बंदी नको असेल तर त्यांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध नको असतील तर मास्क वापरा.